पालघर तालुक्यातील एका गावामधील 45 वर्षीय करोना संशयित रुग्णाचा पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला.या संशयितास ताप व श्‍वसनाचा विकार असल्याने त्याला दाखल करण्यात आले होते.

दोन दिवसापूर्वी संशयितास ताप येत असल्याने त्यांनी पालघर तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतले होते. त्यानंतर शनिवारी सकाळपासून त्यांना पुन्हा ताप व श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. या व्यक्तीच्या घशाचे नमुने तापसणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

मृत व्यक्ती करोना संशयित असल्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीत तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी यांच्या पर्यवेक्षणाखाली अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन वर्षीय मुलगी करोना मुक्त
डहाणू उप जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या तीन वर्षीय मुलीची करोनापासून मुक्ती मिळाल्याने तिला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. या वेळी कॉटेज रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी – कर्मचारी यांनी तिचे टाळ्या वाजवून रुग्णालयाबाहेर स्वागत केले.