शेजारच्या सांगली जिल्ह्यापाठोपाठ आता कोल्हापुरात स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू झाली आहे. यापुढे करोना संशयित रुग्णाचे घशाचे स्त्राव (स्वॅब) घेवून त्याची तपासणी कोल्हापूरात होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने स्वॅब चाचणी प्रयोगशाळा वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. प्रारंभी राज्यात तीन ठिकाणीच करोनाबाधीत संशयीतांचे स्वॅब चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा होत्या.

नुकत्याच नव्याने मंजूर करण्यात आलेल्या ३९ प्रयोगशाळांपैकी कोल्हापुरातील प्रयोगशाळा राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आजपासून सुरु केली आहे. यामुळे आता कोल्हापूर जिल्हा करोना संशयितांची त्वरीत तपासणी करण्यासाठी स्वयंपूर्ण झाला आहे.

याला आयसीएमआरने सुद्धा कोल्हापुरातील प्रयोगशाळेला परवानगी दिली आहे. येथे दररोज किमान ३४० करोना रुग्णाच्या स्वॅबची चाचणी करता येणार असून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील करोनाबाधित संशयीतांच्या चाचणीचे अहवाल लवकर येणे शक्य असल्याचे सांगण्यात आले.