पुणे : राज्यातील शाळांतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्चचे वेतन उणे प्राधिकार पत्राने (बीडीएस) काढण्याची परवानगी शालेय शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात दिली होती. मात्र राज्य शासनाने नुकताच मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याच्या आदेशामुळे पूर्वीचे आदेश मागे घ्यावे लागले असून राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात निधीअभावी शालेय कर्मचाऱ्यांची वेतन देयके उशिराने मंजूर होत असतात. अशावेळी उणे प्राधीकार पत्राचा वापर करून वेतन देयके मंजूर करण्याचे आदेश कोषागरांना केल्या जातात. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेतन वेळेवर होण्यासाठी सोपस्कार पूर्ण केले होते. शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार दोन टप्प्यात होणार आहेत. परंतु राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मार्च ची पगार बिले १० मार्च पूर्वी वेतन पथक कार्यालय यांच्याकडे जमा करण्यात आली होती.

सादर केलेली बिले शंभर टक्के वेतनानुसार काढण्यात आली होती. मात्र दोन टप्प्यात वेतन देण्याच्या नव्या आदेशामुळे पूर्वीची वेतन बिले रद्द करून नव्याने करावी लागणार आहेत. राज्‍यात १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी असल्यामुळे शाळांचे मुख्याध्यापक आणि लिपिक यांना घरी बसून पुन्हा नव्याने वेतन देयके तयार करणे कठीण आहे. १४ एप्रिल नंतर बिले करून वेतन पथक कार्यालयात जमा करण्यास किमान दहा ते पंधरा दिवस लागू शकतात.  त्यामुळे राज्यभरातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मार्च महिन्याचे पगार विलंबाने होण्याची शक्यता आहे.

कोरोनासारख्या कठीण प्रसंगी राज्यातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी शासनासोबत आहेत. पण शिक्षण विभागाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्चचे वेतन लवकर होईल यासाठी प्रयत्न करावे. बऱ्याच शाळांची अजूनही फेब्रुवारी महिन्यातील वेतन देयके जमा झालेली नाहीत. शासनाच्या या नवीन आदेशानुसार त्यास अधिक विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतील. मोठ्या आर्थिक संकटात सामोरे जावे लागेल. शिक्षणमंत्री यांनी अर्थमंत्री यांच्याशी बोलून पुढील एप्रिल महिन्याच्या पगारबिलात शासन आदेशानुसार कार्यवाही करावी, त्याप्रमाणे तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे राज्य सरकार्यवाह श्री शिवाजी खांडेकर आणि पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न कोतूळकर यांनी केली.