राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये अडकून पडलेल्या लोकांनी गावांकडे स्थलांतर करु नये. ते जिथे आहेत तिथेच त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जाईल असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

देशमुख म्हणाले, “करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात लॉकडाउनचा कार्यकाळ वाढवावा लागला आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरीत मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करु नये, त्यांनी आहे तिथेच रहावं. शासनाच्यावतीनं सर्वांची राहण्याची सोय, पुरेसे अन्न देण्याची आम्ही हमी देतो.”

“केवळ आपले राज्य, देश नव्हे तर संपूर्ण जगावर सध्या करोनाचे संकट आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जर कोणी गावी परतण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांना वाटेतच अडविले जाईल. इतकी पायपीट करुन गावात जाऊनही जर गावातील लोकांनी प्रवेश दिला नाही तर आपल्यावर अधिक कठीण प्रसंग ओढवू शकतो. त्याचबरोबर करोनाच्या साथीला बळी पडण्याचा धोकाही वाढेल,” याची जाणीवही गृहमंत्र्यांनी करुन दिली आहे.