महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील करोनासंदर्भातील परिस्थितीबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी  मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन लोकांची तपासणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली. करोनाच्या ७५ टक्के रुग्णांणध्ये सौम्य, अतिसौम्य किंवा अजिबात लक्षणेच दिसत नसलेले रुग्ण असल्याचे सांगितले. अशा रुग्णांना सुद्धा आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येत असल्याचेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कोरनाचे रुग्ण बरे होण्यासंदर्भात भाष्य करताना अगदी चार महिन्याच्या बाळापासून ८४-८५ वर्षांच्या आजीबाईंसुद्धा या आजारातून बऱ्या होऊन घरी जात असल्याचे सांगितले.

“करोनाची एक दहशत लोकांमध्ये आहे. ती संपवण्यासाठी खासगी डॉक्टर, क्लिनिक, रुग्णालयांनी अजूनही पुढे यायला पाहिजे दोन पावलं पुढे आलं पाहिजे.  करोनाची लोकांमध्ये जी दहशत आहे त्याला मी कोविड सिंड्रोम असं म्हणेल. जर लवकर कोणी समोर आलं तर लवकर ती व्यक्ती बरी होऊ शकते, हे मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं आणि आजही तुम्हाला सांगतोय. अगदी सहा महिन्याच्या बाळा पासूनच ८४-८५ वर्षांच्या आजीबाई सुद्धा घरी गेलेल्या आहेत. सोशल मिडियावर या आजींचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. तुम्हीही तो पाहिला असेल. त्या आजी घरी परतत आहेत. सगळे टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करत आहेत,” असं या व्हिडिओबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. करोना झाला म्हणजे संपलं असं नाहीय. फक्त वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे, असंही उद्धव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंनी आपल्या संवादामध्ये ज्या आजीबाईंचा उल्लेख केला त्यांचा व्हिडिओ मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटवर अकाऊंटवरुन गुरुवारी रात्री नऊ वाजता पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लुगडं नेसलेल्या आजीबाई पोलिसांच्या गाडीमधून उतरुन चालताना दिसत आहे. “कोरोना विषाणू विरुद्ध यशस्वी झुंज देणाऱ्या ८२ वर्षांच्या आजींचे घरी जंगी स्वागत!”,अशी कॅप्शन या व्हिडिओ देण्यात आलेली आहे. व्हिडिओमध्ये आजी गाडीमधून उतरुन आपल्या इमारतीमध्ये जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस कर्मचारी टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. तोंडावर मास्क लावलेल्या आजी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत इमारतील प्रेवश केल्यावर हा व्हिडिओ संपतो.

या व्हिडिओला १८ तासांहून कमी कालावधीमध्ये ७३ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. उद्धव ठाकरेंप्रमाणेच ट्विटवरही अनेकांनी या आजींचे कौतुक केलं आहे.