करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेले आणखी तीन रुग्ण नागपूरमध्ये आज (रविवार) आढळून आले आहेत. तसेच बुलडाण्यात देखील एक रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे विदर्भात एकाच दिवसात नव्याने ४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागपूरातील करोनाबाधितांची संख्या १४वर पोहोचली आहे.

नागपूरमध्ये आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी एक व्यक्ती दिल्लीहून प्रवास करुन आली आहे. दरम्यान, लोकांनी घराबाहेर पडू नये तुम्हाला सर्व गोष्टी घरी कशा पोहोचतील याची प्रशासन व्यवस्था करुन देईल, असे आवाहन नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

शहरातील कॉटन मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले आहे. नागरिकांच्या अशा वागण्यामुळं शासनाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. जनतेनं लॉकडाऊनचं योग्य प्रकारे पालन करुन घरातच रहावं, असं आवाहन पुन्हा एकदा मुंढे यांनी नागपूरकरांना केलं आहे.