– नितीन पखाले

करोना टाळेबंदीमुळे ‘लग्न पहावे करून’ या म्हणीचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील एका वधूस आला. करोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनांमुळे नियोजित लग्नाचा मुहूर्त तब्बल दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्याने त्रासलेल्या नववधूने चक्क वराच्या गावी धाव घेतली. नियोजित वर, त्याचे आई-वडील यांच्या उपस्थितीत ‘शुभमंगल सावधान’ म्हणत नववधू-वर चतुर्भूत झाले. बाभूळगाव तालुक्यातील अंतरगाव येथे घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असून धाडसी नववधूचे कौतूक होत आहे.

यवतमाळ शहरातील संकटमोचन परिसरात राहणाऱ्या सुकेशनीचा विवाह बाभूळगाव तालुक्यातील अंतरगाव येथील प्रवीण सोबत ठरला. दोघांच्याही परिवारांनी मुहूर्त शोधून ९ मार्चला लग्न करण्याचे योजले. त्याची तयारी दोन्हीकडे सुरू असतानाच महाराष्ट्रात करोना विषाणूचा संसर्ग फैलला. करोना प्रतिबंधासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पर्याय समोर आल्याने गर्दी होणारे कार्यक्रम, लग्न सोहळे पुढे ढकलण्याचे आवाहन शासन आणि प्रशासनाने केले. या निर्णयाचा आदर करत दोघांच्याही परिवाराने ९ मार्चचा विवाह पुढे ढकलून ३१ मार्च रोजी करण्याचे ठरविले. दरम्यान करोना ससंर्ग रोखण्यासाठी देशात टाळेबंदी लागली. सर्वत्र संचारबंदी सुरू झाल्याने ३१ मार्चलाही या दोघांचा ठरलेला विवाह होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

जगात उद्भवलेलया परिस्थितीची जाणीव ठेवून, सामाजिक भान राखत दोन्ही कुटुंबांनी जवळच्या चार-पाच नातेवाईकांच्या उपस्थितीत वराच्या गावी अंतरगाव येथे विवाह करण्याचे ठरविले. वधूला नेण्यासाठी प्रशासनाकडे वाहन प्रवासाची परवानगी मागितली. आता लग्न होईलच या आशाने घरात सर्व विधी सुरू झाले. नववधूस मेहंदी व हळदही लागली. मात्र अखेरपर्यंत प्रशासनाकडून वाहन परवानगी मिळाली नाही. आता काय करायचे हा प्रश्न सर्वांना पडला असतानाच मेहंदी लागलेल्या हातांनीच सुकेशनीने आपली दुचाकी काढली आणि रस्त्यावरील पोलीस तपासणीचे सर्व अडथळे पार करून ती २० किलोमीटरवर असलेल्या अंतरगाव येथे थेट प्रवीणच्या घरी पोहचली.

आपली होणारी पत्नी लग्नासाठी दुचाकी घेऊन एकटीच आल्याची पाहून हे कुटुंबीयसुद्धा अचंबित झाले. अखेर सुकेशनीने झालेला प्रकार कथन करून किती दिवस दोन्ही कुटुंबांचा जीव टांगणीला ठेवायचा म्हणून उपस्थित लोकांच्या साक्षीने प्रवीणशी आपला विवाह लावून द्यावा, अशी गळ सासरच्यांना घातली. प्रवीणही या विवाहास तयार झाला आणि घरातच अंतरपाट धरून हा विवाह पार पडला. वुधेच आई-वडील आणि कोणीच नातेवाईक या लग्नास उपस्थित नव्हते. करोनामुळे सर्वत्र ठरलेले विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. मात्र सुकेशनी आणि प्रवणीसारखा हटके विवाह सर्वांनाच नाही करता येत!