राज्यामधील करोनाग्रस्तांची संख्या ५० हून अधिक झाल्यामुळे राज्यभरातील सामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. अनेकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर आणि मास्कसाठी मेडिकलमध्ये धाव घेतल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे मास्क आणि बनावट सॅनिटायझर विकले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र भितीमुळे या दोन्ही गोष्टींची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र या सर्व गोष्टींची गरज नसल्याचे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. मुंढे यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये त्यांनी सॅनिटायझर आणि मास्कची बिलकूल गरज नसल्याचे मत नोंदवलं आहे.

जवळजवळ चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मुंढे यांनी करोनासंदर्भातील वैज्ञानिक माहिती दिली आहे. “लोकांनी घाबरून जाऊ नये. घाबरुन जाण्यासारखं या आजारामध्ये वेगळं काहीही नाहीय. करोना हा एक विषाणूच आहे. आपल्याला आधी चार ठाऊक होते आता हा पाचवा आला आहे. या आजाराला थांबवण्यासाठी त्याचा प्रसार कसा होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. या आजाराचा प्रसार ड्रॉपलेट्स (म्हणजेच द्रव्याचे थेंब) मधून होतो. हे ड्रॉलेट एखाद्याच्या चेहऱ्यापर्यंत गेले तर हा आजार होतो. हे टाळण्यासाठी वारंवार हात धुतले पाहिजेत,” असं आवाहन मुंढे यांनी केलं आहे. यावेळेस त्यांनी हात धुणे म्हणजे केवळ एकावर एक चोळणे नाही असंही सांगितलं. हात धुताना ते वैज्ञानिक पद्धतीने म्हणजेच बोटांच्या खाचांमध्ये, नखं, मनगट असं सर्वकाही स्वच्छ धुतले गेले पाहिजे अशा पद्धतीने हात धुवावेत असं मुंढे यांनी सांगितलं.

मास्क वापरू नयेत असंही मुंढे यांनी केलं आहे. “मी स्वत: मास्क वापरत नाही. सर्वांना मास्क वापरण्याची गरज नाहीय. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाच मास्कची गरज आहे. बाकी लोकांनी मास्क वापरू नये यामागील वैज्ञानिक कारण सांगायचं झाल्यास मास्क लावल्यास तो संभाळण्यासाठी वारंवार तोंडाकडे हात जातो आणि त्यामधून संसर्ग होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे मास्क लावू नका, खरेदी करु नका आणि घरी बनवण्याचाही प्रयत्न करु नका. शिंक आली तर हातरुमालामध्ये शिंका. तोही नसेल तर तळहात वापरण्याऐवजी आपलाच दंड तोंडावर आणून शिंका,” असं मुंढेंनी सांगितलं.

सॅनिटायझर विकत घेण्याच्या भानगडीमध्ये पडण्याची गरज नसल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केलं. “साधा साबण वापरुन हात धुवा. वारंवार हात धुवा आणि हात धुतल्या शिवाय तोंडाजवळ नेऊ नका इतकं केलं तरी खूप झालं,” असं मुढें यांनी सांगितलं. तसेच करोना झालेल्या रुग्णापासून तीन फूट किंवा एक मीटर लांब का रहावे याचे कारणही मुंढे यांनी यावेळी सांगितलं. “रुग्ण जोरात खोकला जरी तरी त्याच्या तोंडातील डॉपलेट्स जास्तीत जास्त एक मीटरपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळेच करोनाग्रस्त रुग्णांपासून एक मीटरचे अंतर ठेवा असं सांगितलं जातं. एका मीटरचे अंतर ठेवल्यास रुग्ण कितीही जोरात शिंकला तरी त्यांच्या तोंडातील ड्रॉपलेट्स तुमच्यापर्यंत येणार नाहीत,” असं शास्त्रीय कारण मुंढे यांनी सांगितलं.

तसेच आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा नाहीतर घरुनच काम करा, असं आवाहनही मुंढे यांनी केलं.