राज्यात फोफावत असलेला कोरोना व्हायरस जात आणि धर्म पाहत नाही. त्यामुळे चुकीचे अथवा तेढ निर्माण करणारे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवू नका, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. खोटे आणि चुकीचे, गैरसमज पसरवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले तर कायद्याच्या कचाट्यातून कुणीही सुटणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला.

करोनाशी दोन हात करताना अफवाचा आणखी एक व्हायरस समोर आला आहे. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणारच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोविडपासून महाराष्ट्राला वाचवणारच. मात्र दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला.

आणखी वाचा- दुहीचा व्हायरस पसरवणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री

दोन समाजांमध्ये दुहीचा व्हायरस पसरवणारे व्हिडीओ कुणी गंमत म्हणूनही पसरवत असेल तर त्यापैकी कुणाचीही गय केली जाणार नाही. नोटांना थुंकी लावण्याचा व्हिडीओ किंवा इतर त्यासारखे व्हिडीओ पसरवले जात आहेत. ज्यामुळे दोन समजांमध्ये तेढ निर्माण होते. असं गंमत म्हणूनही कुणी करत असेल तरीही त्यांच्यावर कारवाई होणारच. एकीला गालबोट सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

आणखी वाचा- पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही: उद्धव ठाकरे

करोना विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. या लढ्यात पवारसाहेब सोबत आहेत, पंतप्रधान मोदीजी आहेत, सोनियाजींशीही चर्चा झाली. या लढ्यात महाराष्ट्रासाठी सर्वजण सोबत आहेत. अतिरेक्यासारखंच या व्हायरसनं मुंबईला लक्ष केलं आहे. मुंबईत कोविडसाठी स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. चिंता करण्याची कारण नाही. सर्वजण मिळून करोनाला हरवू. घराबाहेर कोणीही पडू नका. विनाकरण गर्दी टाळा. जगभर धुमाकूळ घालणाऱ्या करोना व्हायरसेचे राज्यातील रूग्ण वाढत आहेत. राज्यातील करोनाच्या चाचण्यांची संख्या आपण वाढली आहे. त्यामुळे ही संख्या वाढतेय. काळजी करू नका आतापर्यंत आपण ५१ जणांना ठीक करून घरी पाठवले आहे. करोनाच्या लढात सगळेजण जात-पात-धर्म-पंथ विसरुन एकत्र आले आहेत. मी या सगळ्यांचं धन्यवाद करतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.