01 March 2021

News Flash

आता डोक फोडून घ्यायचं का?; …अन् सभेतच अजित पवार संतापले

केंद्र सरकारला केलं लक्ष्य

संग्रहित छायाचित्र

करोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी धोका टळलेला नाही. जगात आणि देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाचा उपद्रव टाळण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहे. महाराष्ट्र सरकारकडूनही जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबर करोनाच्या धोक्याबाबत काळजी घेतली जात आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचं दिसत आहे. याच गोष्टीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये झालेल्या एका सभेत करोनाचा विसर पडलेल्यांना सुनावलं.

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शनिवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे अजित पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलत असताना अजित पवारांनी करोनाचा विसर पडलेल्या नागरिकांची खरडपट्टी काढली.

कार्यक्रम सुरू असताना अनेक नागरिक मास्क न लावता आले होते. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अजित पवार यांनी भाषण करताना करोनाची आठवण करून देत सुनावलं. व्यासपीठावरून बोलताना मास्क न लावलेल्या नागरिकांकडे अंगुली निर्देश करत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. “हे बघा पठ्ठे विनामास्कचे आले आहेत. फिरत आहेत. आता यांच्यापुढे काय डोक फोडून घ्यायचं का?, असं म्हणत अजित पवारांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना सुनावलं. ब्रिटनमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून, परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

लॉकडाउन आणि आर्थिक विकासदर या मुद्द्यांवरून अजित पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. “करोनाच्या काळात सरकारी तिजोरीत पैसे येणं कमी झालं. त्यात केंद्र सरकारकडून राज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी रुपये येणं बाकी आहे. पण तरीही राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीत उपलब्ध असलेल्या पैशांतून कामं सुरू ठेवली आहेत,” असं अजित पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 8:03 am

Web Title: coronavirus update ajit pawar disappointed in public programme bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्याचा रिकव्हरी रेट ९५.२३ टक्क्यांवर; २,६३० नव्या करोनाबाधितांची नोंद
2 आंदोलनाला धक्का बसेल असा निर्णय अण्णां कधीच घेणार नाहीत : मेधा पाटकर
3 “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”
Just Now!
X