‘देशातील परिस्थिती गंभीर आहे. स्पष्ट सांगायचं तर हाताबाहेर गेली आहे. पण देशाच्या राज्यकर्त्यांनी करोना गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. आज बंगालमध्ये जे शक्तिप्रदर्शनं सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं तिकडे करोना नाही. याचं भयावह चित्र नंतर दिसेल,’ असं म्हणत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देशातील करोना परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील निवडणुका पार पडल्यानंतर केंद्र सरकार लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेऊ शकते, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, “देशातंर्गत युद्ध आहे. फडणवीस यांना माहिती असेल सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी करोनामुळे आजारी आहे. सर्व लोक करोनाशी झूंज देत आहे. महाराष्ट्राचे म्हणून एकत्र आलं पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधकांनी हे डोक्यातून काढलं पाहिजे की, आपल्या विरोधकांना करोना होईल, आपल्याला होणार नाही. देशातील परिस्थिती गंभीर आहे. स्पष्ट सांगायचं तर हाताबाहेर गेली आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सर्वांची बैठक घेऊन गांभीर्य समजावून सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेत की, लॉकडाउनशिवाय पर्याय नाही. ही स्थिती संपूर्ण देशाचीच आहे. देशपातळीवर असा निर्णय घेण्याबद्दल पावलं टाकली जात आहेत का?, असं चित्र मला दिसतंय,” असं राऊत म्हणाले.

“प्रत्येक वेळी केंद्र आपल्या पक्षाचं (भाजपाचं) हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेताना दिसतंय. निवडणुका आहेत. पक्ष निवडणुकीत उतरला आहेत. प्रचार सुरू आहे, असं म्हणून माणसांना मारता येणार नाही. धर्म, जात, निवडणुका यापेक्षाही लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. निवडणुका कधीही घेता येईल. राजकारण कधीही करता येईल. लोकांचे जीव महत्त्वाचे. आज बंगालमध्ये जे शक्तिप्रदर्शनं सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं तिकडे करोना नाही. याचं भयावह चित्र नंतर दिसेल. देशाच्या राज्यकर्त्यांनी करोना गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. त्याला आम्ही गांभीर्यानं घ्यायचा इतरांनीही घ्यायलं हवं. तुमचं-आमचं हे त्यांना शोभत ना आम्हाला. देवेंद्र फडणवीसांनी काल बैठकीत मतं मांडली. आम्हाला माहितीये लोकांना लॉकडाउन मान्य नाही. सरकारला माहिती नाही का? मग पर्याय काय, हे तुम्ही सांगता का? माणसं जगवण्याचा, माणसं वाचवण्याचा असं वारंवार मुख्यमंत्री विचारताहेत,” असंही राऊत म्हणाले.

“जगभरात लॉकडाउन हाच एकमेव पर्याय आहे. अमेरिकेत पहा, युरोपमध्ये पहा… अनेक राष्ट्रांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लादायला सुरुवात केली. जास्तीत जास्त लसीकरण.. रेमडेसिवीर यांचा साठा मुबलक उपलब्ध करून देणं, हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. त्याचं खापर कोणत्याही राज्यावर फोडू नका. जसं पुण्यात महापौरांचं प्रकरण झालंय. केंद्राकडून लसी आणल्या. मग केंद्राकडून आणल्यात, तर मुंबईलाही पाठवा. त्यातील खोटारडेपणा सिद्ध झाला,” असं म्हणत राऊत यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली.