27 February 2021

News Flash

माघी एकादशीलाही विठू माऊली एकटीच! पंढरपुरात संचारबंदी

दिंड्यांना प्रतिबंध, विठ्ठल दर्शनही बंद

पंढरपूर : आषाढी, कार्तिकी पाठोपाठ माघी एकादशीला लेकूरवाळी विठ्ठू माऊली एकटीच असणार आहे. लाखो वैष्णवांची यंदाची माघी वारी देखील चुकणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहे. पंढरीत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, विठ्ठल दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. २३ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी आहे.

वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील माघी वारी मात्र करोनाच्या संकटामुळे पहिल्यांदा चैत्र वारी रद्द झाली. त्यानंतर आषाढी, कार्तिकी वारी रद्द करावी लागली. आता माघीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एकादशीला म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ ते २३ फेब्रुवारी रात्री बारापर्यंत पंढरपूर शहरासह शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपुर, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे, भटुंबरे अशा गावातही संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिराने पारित केले.

श्री विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे मुखदर्शन दशमी म्हणजेच २२ आणि एकादशी म्हणजेच २३ फेब्रुवारी असे दोन दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन सामान्य भाविकांना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय मंदिर समितीने यापूर्वीच घेतला आहे. तसेच माघी वारीसाठी पंढरपूर कडे येणाऱ्या पायी दिंड्यांना अटकाव करणे, शहरातील मठ धर्मशाळा मध्ये भाविकांना वास्तव्य करू न देणे, असेही आदेश यानिमित्ताने काढण्यात आले आहेत. तसेच शहरात दूरवरचे ठिकाण निश्चीत करुन एसटी सेवेतील प्रवासी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. परंतु या प्रवासी सेवेतून येणाऱ्या भाविकांना मंदिराकडे तथा शहरात प्रवेश नसेल. ही सेवा केवळ तातडीची आपत्कालीन सेवा राहील. असेही जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 10:55 am

Web Title: coronavirus update maghi ekadashi 2021 curfew in pandharpur temple will close bmh 90
Next Stories
1 यंत्राद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण
2 पावणेदोन कोटींची वीजचोरी
3 महिला प्रवाशावर हल्ला करणारा अद्याप मोकाट
Just Now!
X