राज्यात लॉकडाउन असताना करोनाचा संसर्ग झालेली अनेक प्रकरणं समोर येऊ लागली. त्यामुळे राज्यातील रुग्णांचा आकडाही वाढत चालला आहे. मुंबईत १६ जणांना, तर पुण्यात दोघांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे राज्यातील संख्या ३२० झाली आहे.

देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा महाराष्ट्रात आहे. सुरुवातीच्या काळात मंद गती असताना लॉकडाउनच्या काळात करोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली. बुधवारी हा आकडा ३२०च्या घरात पोहोचला. मुंबईत नव्यानं १६ रुग्ण आढळून आले, तर पुण्यात दोन रुग्ण सापडले आहेत. मंगळवारपर्यंत राज्यात १२ जणांचा मृत्यू झाला. यात पालघरमध्ये एक, तर मुंबईत एकाचा मृत्यू झाला.

मंगळवारी राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना निदानासाठी प्रयोगशाळांचे जाळे विस्तारण्यात आले असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी सिध्द झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत.

घाटकोपर येथील ८६ वर्षीय महिलेचा मंगळवारी करोना संसर्गामुळे हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मुलुंडमधील स्पंदन रुग्णालयात या आधी ती दाखल असल्याने रुग्णालय १४ दिवसांसाठी क्वारंटाईन के ले आहे.  रुग्णालयातील ६१ जणांच्या चाचण्या केल्या असून त्या नकारात्मक आल्या आहेत.