राज्यात दररोज करोना रुग्णसंख्येचं प्रचंड मोठे आकडे समोर येत आहेत. वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवांवरील ताणही वाढत असून, दुसरीकडे कोविड रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. नागपूरमध्येही कोविडबाधित एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या रिसेप्शन काऊंटरची नासधूस करत काऊंटरच पेटवून दिलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

नागपूरमधील होप रुग्णालयात करोनाबाधित महिलेला दाखल करण्यात आलेलं होतं. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह देण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली. मात्र, कोविड रुग्ण असल्यानं रुग्णालयाने नियमानुसार मृतदेह देण्यास नकार दिला. त्यावरून हा प्रकार घडला.

मयत महिलेच्या पतीने मृतदेह सुपूर्द करण्यावरून रुग्णालयातील डॉक्टरांशी वाद घातला. तरीही रुग्णालयाने नकार दिल्यानंतर पतीसह महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या रिसेप्शन काऊंटरजवळ येऊन साहित्याची नासधूस केली. एका व्यक्तीने बॉटलमध्ये आणून रिसेप्शन काऊंटरवर शिंपडले आणि आग लावली.

आग लावल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं ही आग विझवली. याप्रकरणी रुग्णालयात धुडगुस घालत साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी १० जणांना अटक केली आहे. नागपूरचे पोलीस उपायुक्त लोहीत मटानी यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.

नागपुरातील कोरोना स्थिती कशी?

नागपुरात रविवारी ४ हजार ११० जणांचा करोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात ३ हजार ४९७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. ६२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरातील एकूण करोना रुग्णांची संख्या २ लाख ४१ हजार ६०६ वर पोहोचली असून, १ लाख ९४ हजार ९०८ जण करोनामुक्त झाले आहेत. नागपुरात करोनामुळे एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ३२७ इतकी झाली आहे.