करोना संकट गडद होत असतानाच आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारनं नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खबरदारी घेऊन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सरकारनं शाळा उघडण्याची घाई करू नये. त्याचबरोबर दहावी-बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न या वर्षासाठी बदलावा लागेल, त्याचा निर्णय लवकर घ्यावा,” अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. “करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असताना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास पालक बिलकुल तयार नाहीत. पालकांमध्ये प्रचंड असंतोष आणि भीतीचं वातावरण आहे. RTPCR टेस्ट मध्ये राज्यातील ५०० हून अधिक शिक्षक कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती पाहता मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील कोविड संसर्गाची शक्यता असलेल्या सर्व भागातील शाळा, कॉलेजेस बंद ठेवणं उचित ठरेल. तसेच शिक्षकांनाही ५० टक्के उपस्थितीची सक्ती रद्द करून त्यांना वर्क फ्रॉम होमची ऑनलाईन शिक्षणासाठी मूभा देण्यात यावी,” असं पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

“पहिल्या सत्रात माध्यमिक विभागात ऑनलाईन शिक्षण बऱ्यापैकी झाले असले, तरी प्राथमिक विभागात ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. किमान उर्वरित सत्रासाठी कृती पुस्तिका, वर्क बुक, वर्क शीट, ऍक्टिव्हिस्ट बुक छापून हे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवल्यास ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकेल. दहावी, बारावीच्या परीक्षांचा पॅटर्नही या वर्षासाठी बदलावा लागेल. त्याचा निर्णयही लवकर व्हावा. लस येत नाही तोवर शाळा, महाविद्यालयं सुरू करण्याची घाई करू नये. तसेच लस आल्यानंतर आरोग्य आणि पोलीस कर्मचारी यांच्या सोबतच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर आणि अंगणवाडी सेविका यांना प्राधान्याने लस मोफत उपलब्ध करून द्यावी. आपण तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. कृपया लवकरात लवकर आदेश द्यावेत,” अशी विनंती कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे.