महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन असूनही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्यामुळे प्रसाराचा वेग मंदावला असला, तरी करोनाबाधित रूग्णांचा आकडा मात्र सातत्याने वाढताना दिसत आहे. सोलापुरात २८ नवे करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत, तर तिघांचा बळी गेला आहे. एकूण रूग्णसंख्या पाचशेचा आकडा पार करून ५१६ वर पोहोचली आहे. मृतांची संख्याही आता ३७ झाली आहे. मृतांमध्ये २४ पुरूष आणि १३ महिलांचा समावेश आहे.

शुक्रवारी सकाळी करोनाशी संबंधित १०८ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात प्रत्येकी १४ पुरूष व महिलांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले. तर तीन पुरूषांचा मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत २१८ रूग्ण करोनामुक्त झाले आहे आणि सध्या २६१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा- उस्मानाबादची रेड झोनकडे वाटचाल; जिल्ह्यात आणखी ८ जण करोनाबाधित

सोलापुरात गुरूवारी करोनाबाधित १८ नव्या रूग्णांची भर पडून एकूण रूग्णसंख्या ४८८ वर पोहोचली होती. यात ३४ मृतांचा समावेश होता. आतापर्यंत झोपडपट्ट्यांमध्ये असलेला करोना विषाणूचा प्रादुर्भाव आता गावठाण भागातही होऊ लागल्याची माहिती समोर आली होती. तर त्याआधी शहरातील मध्यवर्ती गावठाण भागात करोनाशी संबंधित संशयित रूग्ण आढळून आले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार होत आहेत. पत्रा तालीम परिसरातील एका व्यक्तीला ‘सारी’ची लागण झाल्यानंतर तिला रूग्णालयात हलविले असता करोनाचाचणी घेण्यात आली. यात संबंधित व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिका आरोग्य प्रशासनाने पत्रा तालीम परिसरात औषध फवारणी केली. तसेच लगतच्या बाळीवेशीतही करोनाबाधित पुरूष आढळून आला. बुधवार पेठ, न्यू बुधवार पेठ या भागात रूग्ण सापडण्याची मालिका सुरूच आहे.

आणखी वाचा- मुंबईहून आलेली तरूणी निघाली करोना पॉझिटिव्ह

बुधवारी करोनाबाधित नवे १४ रुग्ण सापडले होते. तर तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरूवारी दुसऱ्या दिवशी १८३ चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात १८ करोनाबाधित रूग्ण सापडले. यात १० पुरूष व ८ महिलांना करोनाने बाधित केले. यातील ११ जणांना ‘सारी’ची लागण झाली. दुसरीकडे बुधवारी एकाच दिवशी ३५ रूग्ण करोनामुक्त झाले. मृतांमध्ये बहुतांशी प्रतिकार शक्ती कमी असलेल्या, मधुमेही, रक्तदाब व अन्य आजारांनी पछाडलेल्या वृद्धांची संख्या जास्त आहे.