जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासातील माहिती

प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाल्यास दाहसंस्कारच करण्याचा आग्रह चुकीचा असून करोना व्याधीलासुध्दा ही बाब लागू असल्याने अशा मृताच्या कौटुंबिक परंपरेचा सन्मान करण्याचे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने दिल्याचे एका अभ्यासातून पूढे आले आहे.

करोनाबाधिकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहास त्याज्य ठरवून अंत्यसंस्काराचा बाऊ केला जात असल्याचे विविध घटनातून समोर आले आहे. मृतदेहामुळे बाधा होत असल्याच्या संशयातून रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून देखील मृतदेहाची विटंबना होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते व सेवाग्रामच्या महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्थेच्या न्याय वैद्यकशास्त्राच्या विभागातील प्रा. डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी आपले निरिक्षण नोंदविले. जागतिक आरोग्य संघटनेने २४ मार्च २०२० ला तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मृतदेह व्यवस्थापन निर्देशाचा अभ्यास करीत डॉ. खांडेकर यांनी या संदर्भातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

योग्य काळजी घेतली तर  संक्रमित मृतदेहापासून संसर्ग पसरण्याची शक्यता नसल्याचे डॉ. खांडेकर यांनी स्पष्ट केले आहे. साथीच्या आजारातील मृतदेहामुळे अन्य व्यक्तीस त्या रोगाची लागण होवू शकते, असा एकही पूरावा नाही. तसेच बहूतेक विषाणू मृत्यूनंतर मानवी शरिरात जास्तकाळ टिकत नाही, असे आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. अशा प्रकरणात दहन करावे की दफन करावे, हा वादाचा मुद्दाच नाही. मृताचा सन्मान, त्यांची धार्मिक परंपरेचे संरक्षण केले पाहिजे, असेही आरोग्य संघटनेच्या निर्देशात नमूद आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मृतकाच्या नातलगांसाठी काही सूचना केल्या आहते. त्यानुसार,  मृत शरीर सर्व मानके व सावधगिरी बाळगून रुग्णालयाद्वारे बंदिस्त केला जाईल.

बंदिस्त आवरणालासुध्दा प्रतिबंधक केले जाईल.  मृतदेहाचा फक्त चेहरा पाहण्याची परवानगी शक्य आहे. लिपी वाचणे, पाणी शिंपडणे किंवा अन्य कोणतेही धार्मिक विधी करता येतात.  दहन झाल्यास राख गोळा करण्यात कोणताही धोका नाही. दहन किंवा दफनप्रसंगी गर्दी करू नये, असेही निर्देश असल्याचे डॉ. खांडेकर यांनी नमूद केले आहे.