News Flash

“…तर महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील!”, टोला मारत रोहित पवारांची भाजपाला विनंती

"लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतात"

गुजरातपेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्या दुप्पट आहे. इथे करोना रुग्णांची संख्याही जास्त आहे. तरी महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाअधिक लस पुरवठा का? लस पुरवठ्याबाबत महाराष्ट्राशी केंद्राचा दुजाभाव का केला जातोय, असा प्रश्न सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी उपस्थित केला. लसीच्या तुटवड्यावरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असं चित्र निर्माण झालेलं असताना त्यावर लगेच विधानसभा  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रापेक्षा जवळपास दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुऱवठा राज्याला करण्यात आला आहे, असा पलटवार केला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

“केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, ही अपेक्षा. विरोधी पक्षाला विनंती आहे की, किमान संकट काळात तरी राजकारण करू नका. सरकार पडणार नाहीच पण ते पडावं यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत. संकटकाळी जनतेसोबत, सरकारसोबत उभं रहावं. महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील!” असे रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. तसेच, “लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा”, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर नाव न घेता निशाणा साधला. पुढे बोलताना त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचं उदाहरण दिलं. करोना लसीचा साठा संपल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९ तारखेला लसीकरण बंद ठेवलं आहे. त्यावरुन, “किमान आपल्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या महानगरपालिकेने काढलेल्या या पत्रावर तरी भाजपाने विश्वास ठेवावा आणि महाराष्ट्राला पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी!” असं पवार म्हणालेत. तसेच, केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? असे प्रश्नही त्यांनी विरोधकांना विचारले.


दरम्यान, करोना लसीच्या तुटवड्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असं चित्र निर्माण झालं असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा जाणवत आहे. पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास लसीकरण मोहीम ठप्प पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 1:02 pm

Web Title: coronavirus vaccination shortage in maharashtra ncp rohit pawar requests bjp not to play politics sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “सध्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना एकच काम दिलंय…!” भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा सरकारवर निशाणा!
2 बीडच्या दांपत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
3 “सर्वच परीक्षा पुढे ढकला”, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Just Now!
X