देशासह राज्यात करोना लसीकरणाला शनिवारपासून सुरूवात झाली. मात्र, राज्यात लसीकरण अभियानं दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं. लस नोंदणीसाठीचं ‘को-विन’ अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं १८ जानेवारीपर्यंत लसीकरण थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागानं हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
करोनावरील दोन प्रतिबंधात्मक लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर देशात लसीकरणाला शनिवारपासून सुरूवात झाली. देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ झाला. मात्र, पहिल्याच दिवशी राज्यात को-विन अॅपमध्ये तांत्रिक दोष झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे राज्यात १७ व १८ जानेवारी होणारं लसीकरण स्थगित करण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांमधून प्रसिद्ध झालं.
लसीकरण स्थगित करण्यात आल्याचं वृत्त राज्याच्या आरोग्य विभागानं फेटाळलं आहे. “राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये १८ जानेवारीपर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्तासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे की, महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही करोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे,” असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.
करोना लसीकरणासाठी केंद्राने उपलब्ध केलेले ‘को-विन’ अॅप शुक्रवार रात्रीपासून चालत नसल्याने पालिकेच्या यंत्रणांचा मुंबईत गोंधळ उडाला होता. शुक्रवारी रात्रीपर्यंत लाभार्थ्यांची यादी तयार झाली तरी को-विन अॅप मधून संदेश पाठविले जात नव्हते. त्यामुळे शेवटी रुग्णालयांच्या जवळच्या भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी बोलवावं लागलं. काही आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी सकाळीदेखील लसीकरणासाठी येण्याचे फोन आल्याचे प्रकार घडले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2021 8:22 am