करोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील लसीकरण मोहीम थंडावली आहे. राज्यातील अनेक लसीकरण केंद्र लसीविना बंद करण्यात आली असून, मुंबईतही आठवडाभरासाठी केवळ शासकीय लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसी देण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्यात शाब्दिक चकमक सुरू असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला जात असल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर केंद्र-राज्य यांच्यात वादाची ठिणगी पडली. लस वाटपावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आरोपावर टीका केली होती.

हर्ष वर्धन आणि प्रकाश जावडेकर यांनी टीका केल्यानंतर राजेश टोपे यांनी आकडेवारी सांगत वस्तुस्थिती मांडली होती. ‘लस’कारणावरून केंद्र-राज्य यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिलं आहे. “आपण पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिलं आहे. एका आठवड्यात महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही,” असा इशारा राजू शेट्टी यांनी मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांना दिला आहे.

लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी राज्यांकडून केंद्राकडे केली जात आहे. लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक केंद्र बंद करण्यात आली आहे. तर पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्यानं मुंबईत केवळ पुढील आठवडाभर शासकीय लसीकरण केंद्रच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशीच परिस्थिती राज्यातील इतर शहरं आणि जिल्ह्यात दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus vaccine shortage in maharashtra raju shetti warned pm modi and harsh vardhan bmh
First published on: 10-04-2021 at 09:34 IST