राज्यभरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात करोनाला शिरकाव करू दिलेला नाही. अशात एएनआय या वृत्त संस्थेनं चंद्रपूर जिल्ह्यात करोनाचा रुग्ण सापडल्याचं वृत्त दिलं होतं. हे वृत्त चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त चुकीचं असून, चंद्रपूर जिल्हा करोनामुक्त आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “काही प्रसार माध्यमांमध्ये चंद्रपूरमध्ये करोनाचा बाधित रुग्ण असल्याचं प्रसारित करण्यात आलं आहे. मात्र, आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातून जितके नमुने पाठवण्यात आले, त्या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. आज या घडीपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात नाही. चंद्रपूर जिल्हा हा पूर्णतः करोनामुक्त आहे. प्रसारमाध्यमांमध्ये ज्या रुग्णाबद्दल माहिती दिली जातेय तो रुग्ण इंडोनेशियामध्ये तीन महिन्यांपूर्वी गेलेला चंद्रपूर जिल्ह्यातील व्यक्ती आहे. तो इंडोनेशियातून परत आल्यानंतर त्याचं कुटुंब नागपूरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तिथे चाचणी झाल्यानंतर त्याला करोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्याला नागपूरमध्येच दाखल करण्यात आलं आहे. त्याचा कोडही नागपूरचाच नोंद झाला आहे. त्याचा संबंध चंद्रपूर जिल्ह्याशी नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तो आलेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्यापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की, प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाचं आणि दिलेल्या सूचनाचं पालनं तंतोतंत करावं. आपल्या जिल्ह्यात करोनाला प्रवेश करू देणार नाही, हा विश्वास तुमच्या मनात ठेवा, असं आवाहनही वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील जनतेला केलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या निवेदनानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलास मिळाला आहे.