हर्षद कशाळकर, लोकसत्ता
मुंबईत करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मुबंईतील चाकरमानी कोकणात निघाले आहेत. मात्र गावकऱ्यांनी या मुंबईकरांचा धसका घेतला आहे. गावागावत सध्या प्रवेश बंदीचे बोर्ड लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोकणातील लाखो लोक मुंबईत कामानिमित्ताने स्थायिक आहेत. शिमगा आणि गणेशोत्सवाला हे लोक कोकणात दाखल होत असतात. तेव्हा त्यांच्या आगमनाची गावकरी आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र आता हेच मुंबईकर गावकऱ्यांना नकोसे झाले आहेत.

मुंबई करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. लॉकडाउन आणि संचारबंदीचे आदेश जारी झाले आहेत. लोकांना घरात राहण्याचे निर्देश देण्यात झाले आहेत. मात्र करोनाच्या धास्तीने मुंबईकर चाकरमानी कोकणच्या दिशेने निघाले आहेत. सोमवारी रात्री कशेडी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पहायला मिळालं. या सर्वांची रात्री प्रशासकीय यंत्रणांव्दारे तपासणी करण्यात आली. त्यांची माहिती नोंदवून घेण्यात आली. यानंतर सर्व प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून पुढील प्रवासासाठी पाठविण्यात आले.

मात्र या चाकरमान्यांची गावकऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. गावागावात प्रवेश बंदीचे बोर्ड लागल्याचे चित्र सध्या कोकणात पहायला मिळते आहे. बाहेरील व्यक्तींना आत येऊ नये आणि गावातील लोकांनी बाहेर जाऊ नये अशा सूचना ठिकठिकाणी लावल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावाकडे निघालेल्या या चाकरमान्यांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

गावकीच्या निर्णय प्रक्रियेत एरवी या मुंबईकर मंडळींचा महत्वाचा सहभाग असतो. त्यांच्या निर्देशानुसार गावकीचे अनेक निर्णय होत असतात. आता हेच मुंबईकर गावकऱ्यांना नकोसे झाले असल्याचे यानिमित्याने दिसून येत आहेत.