संचारबंदीचा भंग केल्याचा ठपका ठेवून बुधवारी ३२ दुकानांना टाळे ठोकण्यात आले होते. या प्रकरणी दुकानदाराचा काहीच दोष नसल्याचा खुलासा करीत वर्धा मर्चट असोसिएशनने दुकानं बेमुदत बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. आज दुकाने बंद ठेवण्यात आल्यानंतर प्रशासनाने संघटनेशी संवाद साधला. यानंतर दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आला.

दरम्यान, अशा प्रसंगी दुकानं बंद ठेवणे उचित नसून त्वरीत आंदोलन मागे घेण्याचे प्रशासनाकडून सुचविण्यात आले होते. त्यावर संघटना पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाच्या प्रत्येक आदेशाचे पालन केल्या जात आहे. योग्य त्या स्वच्छतेच्या सोयी दुकानदार ठेवत आहे. मात्र काही ग्राहक सूचना पाळत नाहीत. त्यांना वारंवार सांगूनही ते जर ऐकत नसेल तर त्यात दुकानदारांचा काय दोष, असा सवाल संघटनेकडून करण्यात आला. त्यामूळे टाळे ठोकण्याची कारवाई दुकानदारांचे मनोबल खचविणारे असल्याने ही कारवाई मागे घेण्याची विनंती करण्यात आली. शेवटी प्रशासनाने प्रत्येकी पाचशे रूपयाचा दंड ठोठावून दुकाने उघडी करण्यास परवानगी दिली. आता यापूढे नियम न पाळणाऱ्या ग्राहकास दोनशे रूपयाचा दंड ठोठावल्या जाणार आहे.

संघटनेचे सचिव इद्रिस मेमन हे म्हणाले, या अशा कठीण काळात सहकार्य करण्याची आमचीही भूमिका आहे. आजचा बंद प्रतिकात्मक होता. शुक्रवारी व्यापारओळ बंद असते. मात्र जनतेच्या हितास्तव उद्या शुक्रवारीसुध्दा दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ग्राहकांनीसुध्दा नियम पाळावेत, असे आवाहन मेमन यांनी केले.