– प्रशांत देशमुख

वर्धा : करोनाच्या टाळेबंदीत अनेकांच्या घरातील चुलीच विझल्याची आपत्ती होती. मात्र या टाळेबंदीतच गरजेपोटी आलेल्या संधीने हजारो कुटूंबातील चूली पेटत राहल्याचे उदाहरण महिला बचतगटांच्या कामगिरीतून पूढे आले आहे. मुखपट्ट्यांची मागणीनूसार गरज भागवित २५ लाखाची उलाढाल करीत महिलांनी सरकारला दिलासा तर दिलाच, सोबतच स्वत:चा चरितार्थही चालविला.

जिल्ह्यातील १८१ बचतगटांच्या १ हजार ६५४ महिलांनी मिळून १ लाख ३२ हजार २२९ मुखपट्ट्या तयार करीत २५ लाख ७९ हजार ७३० रूपयांची उलाढाल केली. रोख नफा ११ लाख रूपये पदरात पडला. या काळात व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी ही उलाढाल ठरली. करोनाचे संक्रमण वाढू लागल्यावर मुखपट्टी अनिवार्य ठरली. सर्वत्र तुटवडा जाणवायला लागला. आवश्यक असणाऱ्या आरोग्य यंत्रणेस मुखपट्ट्यांची चणचण जाणवायला लागल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे व प्रकल्प संचालक सत्यजीत बडे यांना जिल्ह्यातील बचतगटांची आठवण झाली. बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर हे आव्हान स्वीकारण्यात महिलांनी तत्परता दाखविली.  प्रामुख्याने ग्रामीण भागात कार्यरत गटातील महिला वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत आहेत. मुखपट्टी तयार करण्याचा अनुभव अनेकांना नव्हता. पण टाळेबंदीमूळे घरातील पुरूषांचा रोजगार संपलेला व बचतगटाचे कामही ठप्प पडले असल्याने महिलांनी मुखपट्टीचे तंत्र शिकून घेत शिवणयंत्रही शोधली. दिवसातील दहा तास शिवणयंत्र घरघरू लागली.

आठही तालूक्यातील बचतगटांनी लागेल तसा पूरवठा सुरू केला. कापडाची दुकाने बंद असल्याने हे काम ठप्प पडत असण्याची स्थिती आल्यावर वर्धा शहर कपडा लाईन संघटनेने तत्परतेने माफक दरात पाहिजे तेवढे कापड उपलब्ध करून दिल्याची माहिती उमेद अभियानाच्या व्यवस्थापक श्रीमती स्वाती वानखेडे यांनी दिली. आरोग्य खात्याचे विविध विभाग, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत तसेच स्वयंसेवी संस्थांना पुरवठा करण्यात आला.

वीस ते पंचवीस रूपये दराने उत्पादन खर्चावर आधारित विक्री झाल्याचे विपणन व्यवस्थापक मनिष कावडे यांनी सांगितले. करोनाच्या संकटात हातपाय गळून बसलेल्या अनेक गावात या गटांनी उर्जा आणली. जिल्ह्यातील बचतगट अनेक बाबतीत राज्यात आघाडीवर राहले आहे. मास्कच्या व्यवसायातसुध्दा महिलांनी चांगली कामगिरी बजावल्याचे श्रीमती वानखेडे नमूद करतात.  जीवन्नोनती महिला बचतगटाच्या अध्यक्ष संगिता गायकवाड सांगतात की या काळात संपूर्ण कुटूंब घरातच बसून होते. घर कसे चालणार ही चिंता असतांनाच मास्कचा व्यवसाय हाती आल्याने प्रश्ना मिटला. प्रत्येकीला तीनशे रूपये रोज पडला. सरकारची गरजही भागली. व आम्हीही सावरलो.