करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने लोकांवर गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काही लोक घराबाहेर पडण्याचा हट्ट करत आहे. सांगलीत अशीच एक घटना समोर आली असून पतीने माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीमधील जत तालुक्यात ही घटना घडली आहे.

जत तालुक्यातील नवाळवाडी येथे राहणाऱ्या बेबीजान इब्राहिम नदाफ यांना आपल्या माहेरी जाण्याची इच्छा होती. पती इब्राहिम नदाफ यांच्याकडे त्या वारंवार माहेरी सोडण्याची मागणी करत होत्या. कर्नाटकातील विजापूर येथे त्यांचे माहेर आहे. लॉकडाउन असल्याने प्रवास करणं शक्य नसल्याने पती इब्राहिम नदाफ यांनी आपण नंतर जाऊ असं सांगितलं होतं. पण यामुळे दोघांमध्ये भांडण झालं.

आणखी वाचा- Coronavirus : समुपदेशन करणाऱ्या परिचारिकेसह पतीच्या जाळल्या दुचाकी

पती माहेरी सोडत नसल्याने बेबीजान नदाफ नाराज झाल्या होत्या. पती शेतामध्ये गेल्यानंतर बेबीजान इब्राहिम नदाफ यांनी आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. एका मुलाचं वय पाच तर दुसऱ्याचं तीन वर्ष होतं. आत्महत्येची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास करत होते.