मार्च महिन्याच्या सुरूवातीला संथ असलेल्या करोनाच्या संसर्गानं महिनाअखेरीस उसळी घेतली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुपटीनं वाढली. त्यामुळे केंद्र आणि राज्यांच्या चिंतेत भर पडली. दुसरीकडं मृत्यूदरही वाढला असून महाराष्ट्रातील परिस्थिती काळजी करण्यासारखी बनली आहे. देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आणि झालेल्या मृत्यूची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे १४ एप्रिलनंतरही राज्यातील लॉकडाउन कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Blog

Highlights

    22:19 (IST)06 Apr 2020
    पिंपरी-चिंचवडमधील 'त्या' ४२ डॉक्टरांची करोना चाचणी निगेटिव्ह

    पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे ४२ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यांपैकी सर्व ४२ डॉक्टरांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर, उर्वरित ५० लोकांचा चाचणी अहवाल उद्या येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

    22:10 (IST)06 Apr 2020
    नागपुरात करोनाचा पहिला बळी


    नागपुरात ६८ वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरातला करोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. या रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने मेयो रुग्णालयात ४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाला रुग्णालयात आणण्यात आल्यापासून त्याच्याजवळ कुणीही नातेवाईक आले नाहीत. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतरही नातेवाईक आले नाहीत. पोलिसांसह आरोग्य विभागातील कर्मचारी मृत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचां शोध घेत आहेत.

    21:59 (IST)06 Apr 2020
    पुणे विद्यापीठाच्या डिझाईन इनोवेशन सेंटरतर्फे ‘फेस प्रोटेक्शन कव्हर’ची निर्मिती

    कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाबळ येथील ‘डिझाईन इनोवेशन सेंटर’ने अशा संसर्गापासून चेहऱ्याला संरक्षण देण्यासाठी ‘फेस प्रोटेक्शन कव्हर’चे डिझाईन निवडले आहे. त्यानुसार त्याचे उत्पादनही सुरू करण्यात आले असून, ती आरोग्य केंद्रांवरील सेवक व पोलिसांच्या वापरासाठी ती पाठविण्यातही आली आहेत.

    21:31 (IST)06 Apr 2020
    "१५ एप्रिलनंतर भारतात आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा"

    तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी १५ एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ठेवा अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी BCG च्या अहवालाचा हवाला दिला आहे. ३ जूनपर्यंत भारतात परिस्थिती आटोक्यात येईल असं या अहवालात म्हटल्याचं राव यांनी स्पष्ट केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवण्याची मागणी केली आहे.

    21:30 (IST)06 Apr 2020
    "१५ एप्रिलनंतर भारतात आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा"

    तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी १५ एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ठेवा अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी BCG च्या अहवालाचा हवाला दिला आहे. ३ जूनपर्यंत भारतात परिस्थिती आटोक्यात येईल असं या अहवालात म्हटल्याचं राव यांनी स्पष्ट केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवण्याची मागणी केली आहे.

    21:28 (IST)06 Apr 2020
    साताऱ्यात २२ वर्षीय युवकाला करोनाची लागण

    सातारा : साताऱ्यात एका २२ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी या तरुणाच्या वडिलांचा करोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या संपूर्ण कुटुंबाला तापसणीसाठी पाठविण्यात आले आहे.

    21:25 (IST)06 Apr 2020
    वर्ध्यात लॉकडाउनच्या काळातही सुरु असलेल्या गावठी दारुच्या भट्ट्या उद्धवस्त

    वर्धा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदी असली तरीही चोरून दारू विकण्याचे मोठे प्रमाण आहे. जिल्ह्याबाहेरून येणारी विदेशी दारू व जिल्ह्यात गाळली जाणारी गावठी दारूचे प्रमाण अधिक असते. मात्र, सध्या लॉकडाउनच्या काळात विदेशी दारूची वाहतूक ठप्प झाली असली तरी गावठी दारू लपून छपून तयार केली जात आहे. पोलिसांनी आज अशाच एका टोळीचा छडा लावला. स्थानिक गुन्हा शाखेतर्फे वर्धा शहरातील काही भागात सुरु असलेल्या दारुच्या भट्ट्या नष्ट केल्या. यावेळी २ लाख रुपयांचा माल नष्ट करण्यात आला.

    21:19 (IST)06 Apr 2020
    Lockdown: गस्तीवरील पोलिसांना पाहून पळणाऱ्या अल्पवयीन मुलाचा रस्त्यात पडून मृत्यू

    संचारबंदीच्या कालावधीत मोकळ्या रस्त्यावर खेळत असताना गस्तीवरील पोलिसांची गाडी आल्याचे पाहून पळणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा रस्त्यात पडुन मृत्यू झाला. ही घटना माजलगाव (बीड) येथे घडली. पोलिसांच्या भीतीने वेगात पळताना घटना घडल्याचे सांगण्यात आले.

    21:03 (IST)06 Apr 2020
    पालघर जिल्ह्यात २० लाखांचा सॅनिटायझरचा साठा जप्त

    राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना स्वच्छतेसाठी गरजेच्या असलेल्या सॅनिटायझरला सध्या मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या एमआयडीसीतील एका कंपनीतून २० लाखांचा सॅनिटायझरचा बेकायदा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. 

    20:48 (IST)06 Apr 2020
    करोनाविरोधात धर्म, जात, संपद्राय, गरीब-श्रीमंत भेद विसरुन एक येण्याची गरज-राहुल गांधी

    सध्या देश करोना नावाच्या कठीण संकटातून जातो आहे. संकटाचा सामना करण्यासाठी सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सध्याच्या घडीला देशाला बंधूभाव, करुणाभाव आणि माणुसकीची किंमत ही मोठ्या प्रमाणावर समजते आहे. भारताचा आत्मा अखंड आहे. सगळ्यांनी एकजूट दाखवली तर या महामारीवर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

    20:40 (IST)06 Apr 2020
    बीडवासियांची धाकधूक संपली; 'त्या' २९ पोलिसांच्या चाचण्या निगेटिव्ह

    दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमातून लातूरला परतलेल्या आठ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. या बाधितांनी बीड जिल्ह्यातून प्रवास करताना त्यांचा दोन नाकाबंदीवरील २९ पोलिसांशी संपर्क आला. त्यामुळे या पोलिसांसह इतर चौघांना रविवारी जिल्हा रुग्णालयातील विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांची करोनाची चाचणीही करण्यात आली. मात्र, सोमवारी सायंकाळी या सर्वच्या सर्व पोलिसांची चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल समोर आला. त्यामुळे जिल्ह्याची वाढलेली धाकधूक संपली. सविस्तर वृत्त वाचा

    20:14 (IST)06 Apr 2020
    महाविद्यालय, सीईटी परीक्षा वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

    राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीकक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (सोमवार) दिली. तसंच विद्यापीठ आणि महाविद्यालय परीक्षेच्या नियोजनासाठी समिती स्थापन केल्याची माहितीही त्यांनी दिली.

    20:13 (IST)06 Apr 2020
    मुकेश अंबानींच्या एकूण संपत्ती १.३३ लाख कोटींची घट

    करोना व्हायरसंनं जगभरात थैमान घातलं आहे. करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर सर्वत्र उद्योगधंदेही ठप्प आहेत. अशा परिस्थितीत रिलायन्स इडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत तब्बल १.३३ लाख कोटी रूपयांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १७ व्या स्थानावर घसरले आहेत. सोमवारी जारी करण्यात आलेल्या एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली.

    19:45 (IST)06 Apr 2020
    पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी होणार सील

    करोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आठवडाभराचे साहित्य घेऊन ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सविस्तर वृत्त वाचा

    19:38 (IST)06 Apr 2020
    मातोश्री परिसरात करोनाचा रुग्ण, मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी होणार

    मातोश्री परिसरात करोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. मातोश्री परिसरात असलेल्या एका चहावाल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्रीच्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या PWD च्या गेस्ट हाउसजवळ हा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. ए

    19:10 (IST)06 Apr 2020
    कल्याण डोंबिवलीत भाजी, किराणा दुकाने पाच नंतर बंद

    कल्याण-डोंबिवलीत भाजी आणि किराणा दुकाने पाचनंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली शहर परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ७ एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

    18:44 (IST)06 Apr 2020
    कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलेल्या खलाशांचा झाला हिरमोड

    करोना संसर्गाच्या समाज माध्यमांवर येणारा बातम्या, देशातील एकंदर परिस्थितीचा परिणाम तसेच आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निर्माण झालेल्या ओढीमुळे गुजरात राज्यातील वेरावळ येथून कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या राज्यातील सुमारे आठशे खलाशांना अखेर पुन्हा वेरावळच्या दिशेने परतावे लागले. गुजरातच्या शासनाने महाराष्ट्रातील खलाशांना महाराष्ट्राच्या हद्दीलगतच्या नारगोळ बंदरामध्ये उतरवून घेण्यास नकार देऊन केलेल्या दुजाभाव भावामुळे त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली. सविस्तर वृत्त वाचा

    18:18 (IST)06 Apr 2020
    नाशिकमध्ये करोनाचा दुसरा रुग्ण आढळला

    नाशिकमध्ये करोनाचा दुसरा रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात एक रुग्ण आढळला होता. आता आज आणखी रुग्ण नाशिकमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे

    18:12 (IST)06 Apr 2020
    चंद्रपुरात दिवे लावा कार्यक्रमात फटाक्यांची आतशबाजी, दोन घरं पेटली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले लाईट बंद करुन दिवे किंवा मेणबत्ती लावा असं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र टाळेबंदी असताना काही ठिकाणी फटाके वाजवण्यात आले. चंद्रपुरातल्या काही भागातही फटाके लावण्यात आले. त्यामुळे चंद्रपुरातल्या जिवती तालुक्यात असलेली दोन घरं आगीत जळून राख झाली. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघा देश एकत्र आला आहे हा उद्देश मनात ठेवून एक दिवा आपल्या दारात किंवा गॅलरीत पेटवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. मात्र फटाके वाजवण्यात आल्याने जिवती या ठिकाणी दोन घरांचं अतोनात नुकसान झालं.

    18:09 (IST)06 Apr 2020
    मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ४९० वर

    राज्यातील आकड्यासोबतच मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबईत करोनाचे ५७ नवे रूग्ण सापडले असून मृतांचा आकडाही आता ३४ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे वसई-विरारमधील नालासोपारा येथील पेल्हार येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय गर्भवती महिलेचा मुंबईतील नायर हाॅस्पीटल मध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान वसईतील मृतांचा आकडाही आता ३ व पोहोचला आहे.

    17:41 (IST)06 Apr 2020
    कोल्हापुरात महिला रुग्णाची करोना चाचणी पॉझिटिव्ह

    कोल्हापूरमध्ये एका महिला रुग्णाची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत कोल्हापूरमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. 

    17:09 (IST)06 Apr 2020
    पंतप्रधानांनी लॉकडाउन न वाढवण्याचे दिले संकेत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाउनच्या काळातले निर्बंध सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच लॉकडाउन संपल्यानंतर आवश्यक धोरणं आखणं गरजेचं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. लॉकडाउन संपल्यानंतर दहा मुख्य निर्णयांसह तयार रहा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना म्हटलं आहे.

    17:07 (IST)06 Apr 2020
    वसई-विरार शहरात करोनाबाधितांची संख्या पोहोचली १७वर; दोघांचा मृत्यू

    वसई-विरार शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. सोमवारी शहरातील करोनाबाधितांची संख्या १७वर पोहोचली. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा दोनवर पोहोचला आहे.

    16:45 (IST)06 Apr 2020
    १४ एप्रिलनंतर ग्रामीण भागातली टाळेबंदी सरकारने उठवावी-राजू शेट्टी

    १४ एप्रिलला देशातली टाळेबंदी (लॉकडाउन) संपल्यानंतर महानगरं आणि काही बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागाला त्यातून वगळण्यात यावं अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. टाळेबंदीचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. द्राक्षं, आंबे, पपई, भाजीपाला आणि दूध हे बाजारपेठांपर्यंत न पोहचवता आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली साखळी अबाधित असल्याचा दावा सरकारने केला असला तरीही ते म्हणणे आणि वास्तव हे वेगळे आहे असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

    16:44 (IST)06 Apr 2020
    शस्त्रक्रिया केलेला रुग्ण निघाला करोनाबाधित; डॉक्टरांसह ९३ जण क्वारंटाईन

    पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ३१ मार्चला अपघातग्रस्त व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने केली होती. त्यानंतर त्या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. तातडीने त्याचा चाचणी अहवाल पाठवण्यात आला तेव्हा तो करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

    16:41 (IST)06 Apr 2020
    करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हरभजन, युवराज सरसावले...

    सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे.देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी PMCaresFunds निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले असून त्याला माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी सकारात्मक पाठिंबा दर्शवला आहे.

    वाचा सविस्तर...

    युवराजची करोना विरोधातील लढाईत उडी; केली ५० लाखांची मदत

    CoronaVirus : कौतुकास्पद! हरभजनकडून ५००० कुटुंबांना अन्नदान

    16:38 (IST)06 Apr 2020
    पाच लाख टेस्टिंग किटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे - आरोग्य मंत्रालय
    16:36 (IST)06 Apr 2020
    तबलिगी आहेत म्हणजे नक्कीच करोना असणार; भाजपा आमदाराचे ट्विट

    ज्या ज्या ठिकाणी तबलिगी जमातचे लोक आहे त्या त्या ठिकाणी करोना असणारचं असं वक्तव्य भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटरवरुन आपलं मत व्यक्त केलं आहे. तबलिगी जमातच्या काही लोकांमुळे अनेक राज्यांमध्ये करोनाचा प्रसार झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावर त्यांनी टीका केली आहे. दिल्ली विमानतळावर आठ तबलिगींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तबलिगी आहे तर करोना आहे. कधीही कुठेही, अशा आशयाचं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यांनी या परिस्थितीवर आपल्या ट्विटरवरून टीका केली आहे.

    16:35 (IST)06 Apr 2020
    करोनासमोर जपान हतबल, आणीबाणी जाहीर करण्याची तयारी

    करोनाने जगभरात थैमान घातलं असून यामध्ये जपानचाही समावेश आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहे, मात्र याचा फैलाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नाही. जगभरातील १० लाख लोक करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान देशात करोनाचा फैलाव वाढत असल्याने जपाना आणीबाणी घोषित करण्याच्या तयारीत आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे मंगळवारी देशाला संबोधित करणार आहेत.

    16:22 (IST)06 Apr 2020
    मदतीसाठी गंभीरने देऊ केले १ कोटी रुपये; केजरीवाल म्हणतात, “पैशांची समस्या नाही, पण…”

    दिल्लीमध्ये करोना व्हायरसचा फैलाव वेगाने होतोय, अशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खासदार गौतम गंभीर यांनी देऊ केलेल्या एक कोटी रुपयांच्या मदतीबाबत आभार मानले आहेत. पण, ‘आम्हाला पैशांची समस्या नाहीये, तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटची (PPE) आवश्यकता आहे’. त्यामुळे पीपीई उपलब्ध करुन देण्याची केजरीवालांनी गौतम गंभीरकडे विनंती केली आहे. (वाचा सविस्तर)

    16:16 (IST)06 Apr 2020
    देशभरातील करोनाबाधितांची संख्या ४०६७ वर, १०९ जणांचा मृत्यू

    देशभरातील करोनाबाधितांची संख्या ४०६७ वर पोहोचली असून १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४१ रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालायने दिली आहे. गेल्या २४ तासांत ६९३ नवे रुग्ण आढळले आहेत. ११४५  रुग्ण तबलिगी मरजकशी संबंधित आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

    15:52 (IST)06 Apr 2020
    मोठा निर्णय! खासदारांची वर्षभरासाठी ३० टक्के वेतन कपात

    करोनाशी लढण्यासाठी खासदारांची ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. तूर्तास १२ महिन्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. करोनाशी लढता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

    14:49 (IST)06 Apr 2020
    स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट, रघुराम राजन यांचा मोदी सरकारला इशारा

    “भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टप्प्यात आहे. सरकारने हे आव्हान पेलण्यासाठी विरोधी पक्षांसोबत तज्ञांची मदत घेतली पाहिजे,” असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय. देशात करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानांबद्दल त्यांना खास ब्लॉग लिहिला असून, त्यात त्यांनी सरकारला पुढील संकटाबद्दल सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक

    13:19 (IST)06 Apr 2020
    'करोना'शी लढाई! बाबा आमटेंचं 'आनंदवन' पुरवणार ४० हजार 'फेस मास्क'

    करोनाविरोधात लढण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची तिसरी पिढी देखील सज्ज झाली आहे. आनंदवन या बाबा आमटेंच्या कुष्ठरोग्यांसाठी असलेल्या संस्थेकडून आता कापडाची थ्री लेयर मास्क निर्मिती सुरू झाली आहे. करोनाच्या संसर्गापासून रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक कापडाच्या मास्कसह, संपूर्ण चेहरा झाकण्यासाठीचे फेस शील्ड आता बाबा आमटेंची महारोगी सेवा समिती संस्था तयार करणार आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करत असून हे पूर्णपणे मोफत संस्थेकडून दिले जात आहेत. (वाचा सविस्तर)

    13:09 (IST)06 Apr 2020
    तबलिगी जमातने माफीनामा जाहीर करावा, मुस्लीम सत्यशोधक मंडळाची मागणी

    तबलिगी जमातने माफीनामा जाहीर करावा अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून करण्यात आली आहे. दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये तबलिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म दिवसेंदिवस पुढे येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी तबलिगी जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलिगीच्या असंवेदनशील  वर्तनाबद्दल मुस्लीम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे असं मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दिन तांबोळी यांनी म्हटलं आहे.

    11:30 (IST)06 Apr 2020
    आपले वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

    करोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले वैयक्तिक योगदान म्हणून संपूर्ण वर्षभर आपले ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याची घोषणा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली. मार्च महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

    11:18 (IST)06 Apr 2020
    घरातच थांबा, शरद पवारांचं आवाहन

    संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचना पाळूया आणि यशस्वीपणे जिंकत इतिहास घडवूयात असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

    11:13 (IST)06 Apr 2020
    करोना फोफावतोय: पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

    राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे.

    11:11 (IST)06 Apr 2020
    तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

    दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची अजिबात गरज नव्हती असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. वारंवार टीव्हीवर यासंबंधी बातम्या दाखवून सांप्रदायिक कलह वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

    मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Coronaviruslockdown live update coronavirus covid 19 and lockdown in india live update letest news about coronavirus and lockdown
    First published on: 06-04-2020 at 07:18 IST