09 April 2020

News Flash

शेतकरी कर्जमुक्ती योजनेला करोनाचा फटका

खाते प्रमाणीकरणाची गती मंदावली

संग्रहित छायाचित्र

प्रबोध देशपांडे

राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर करोनाचा विपरीत प्रभाव पडला आहे. शेतकऱ्यांच्या खाते प्रमाणीकरणाची गती अत्यंत मंदावली आहे. गत दोन आठवडय़ांत ती केवळ सरासरी ५ टक्क्यांवर आली असून प्रशासकीय स्तरावरदेखील कर्जमुक्तीचा विषय मागे पडल्याचे चित्र आहे.

सध्या करोना या विश्वव्यापी संकटाचा सामना सर्वत्र खंबीरपणे केला जात आहे. केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. करोना विषाणूचा प्रसार होण्यापूर्वी महाराष्ट्रात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया अत्यंत गतीने करण्यात येत होती. मात्र, आता करोनामुळे कर्जमुक्ती योजनेचे कार्यही प्रभावित झाले आहे. राज्यात १५३ लाख शेतकरी आहेत. दुष्काळसदृश परिस्थिती व शेतकऱ्यांवरील संकट लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अल्पमुदतीचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली. २७ डिसेंबरला त्याचा शासन निर्णय काढून प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी २१ फेब्रुवारीपासून त्यांच्या कर्जखात्याची माहिती पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर आधार कार्ड, विशिष्ट क्रमांक व पासबुक घेऊन शेतकऱ्यांना प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्याची सुविधा सेतू केंद्र, गटसचिव व बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. गत महिन्यापासून ही प्रक्रिया वेगाने सुरू होती. राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात दरदिवशी साधारणत: ८ ते १० हजार खात्यांचे प्रमाणीकरण झाले. राज्यात करोनाचा प्रभाव जाणवू लागल्यापासून याचे प्रमाण कमालीचे घसरले आहे. खात्याचे प्रमाणीकरण बाकी असतानाही करोनाच्या धास्तीमुळे लाभार्थ्यांकडून ते पुढे ढकलण्यात येत आहे. हे चित्र संपूर्ण राज्यात दिसून येते. अकोला जिल्हय़ाचा विचार केल्यास १ लाख ८ हजार ४१५ कर्जखाती अपलोड झाली आहेत. विशिष्ट क्रमांकासह ८६ हजार ६२३ कर्जखाती असून, ७३ हजार १६१ खात्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. अद्याप १३ हजार ४३७ खात्यांचे प्रमाणीकरण शिल्लक आहेत. २ हजार ६७९ तक्रार असलेली खाती आहेत, तर ६६५ खात्यांचे डीएलसीद्वारे तक्रार निवारण करण्यात आले आहे. अकोला जिल्हय़ात ६३१ सेतू, १५० गटसचिव व २५ जिल्हा बँकेमध्ये असे एकूण ८०६ ठिकाणी प्रमाणीकरणाची व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला दरदिवशी सुमाारे १० हजार खात्यांचे प्रमाणीकरण झाले. राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून त्यामध्ये कमालीची घट झाली.

ग्रामीण भागामध्येही करोनाची दहशत

करोनाचा वाढता प्रभाव आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या महानगरांमध्ये दिसून आला. बहुसंख्य शेतकऱ्यांचे वास्तव्य लहान शहरे किंवा ग्रामीण भागात आहे. कर्जमुक्ती योजनेचा विषय प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडित आहे. करोनामुळे प्रमाणीकरणाचे कार्य चांगलेच प्रभावित झाल्याने त्याची दहशत ग्रामीण भागातही असल्याचे स्पष्ट होते.

करोनाचा प्रभाव प्रमाणीकरणावर दिसून आला. त्यामुळे प्रमाणीकरणाची संख्या रोडावली आहे. प्रमाणीकरणाच्या ठिकाणी सर्व काळजी घेतली गेली आहे.

– डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, अकोला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 12:53 am

Web Title: coroner hits farmers debt relief scheme abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 शिक्षण घेण्यास सासरी नकार; अल्पवयीन विवाहितेची आत्महत्या
2 दूध व्यवसायाला फटका
3 सोलापूरचे अर्थचक्र थंडावले
Just Now!
X