महामंडळाच्या घटनेनुसार (कलम १२ अ आणि आ) साहित्य संमेलनाची आमंत्रण/ निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका छापण्यापूर्वी महामंडळाच्या अध्यक्षांची लेखी अनुमती घ्यावी, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे, तसेच संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेली मार्गदर्शन व कार्यक्रम अंमलबजावणी समितीची भूमिकाही महत्त्वाची आहे. निमंत्रण पत्रिकेवरील परशुराम व त्यांच्या परशूचे चित्र, मुख्य व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देण्यात आलेले नाव, कार्यक्रम पत्रिका व व्यासपीठावरील राजकारणी मंडळींचे वर्चस्व यावरून चिपळूण साहित्य संमेलनात वादास तोंड फुटले.
महामंडळाच्या घटनेनुसार आमंत्रण व कार्यक्रम पत्रिकेची घटनात्मक जबाबदारी महामंडळाच्या अध्यक्षांवर आहे. चिपळूणबाबत उषा तांबे यांची लेखी अनुमती घेण्यात आली होती का (संयोजन समितीने त्यांना निमंत्रण पत्रिका दाखवल्यानंतर तांबे यांनी त्याच वेळी आपला आक्षेप नोंदवला की नाही, आता वाद अंगाशी आल्यानंतर महामंडळ, पर्यायाने उषा तांबे आपली जबाबदारी झटकत असल्याचा दावाही सूत्रांनी केला.
 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संपूर्ण कार्याचे नियंत्रण व संयोजन संस्थेला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संमेलन मार्गदर्शन व नियंत्रण समितीची, तसेच महामंडळाच्या अध्यक्षांची असताना आता वाद टाळण्यासाठी आणखी मार्गदर्शक तत्त्वे कसली निश्चित करायची, असा सवालही या सूत्रांनी केला.
याबाबत ‘लोकसत्ता’च्या शनिवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘या तर साहित्य महामंडळाच्या उलटय़ा बोंबा’ या बातमीची चर्चा शनिवारी दिवसभर साहित्य वर्तुळात, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू होती.