गंगाखेड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार सीताराम घनदाट यांच्यासाठी मतदारांना प्रलोभन दाखवताना होत असलेल्या पसेवाटप प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. या प्रकरणात नगरसेवक मनोहर केंद्रे यांनाही सहआरोपी करण्यात आले. केंद्रे यांच्यासोबतच इतर दोघांनाही पोलिसांनी अटक करून ५१ हजार १०० रुपये जप्त केले. रविवारी सायंकाळी राज मोहल्ला गल्लीत हा प्रकार घडला.
रविवारीच घनदाट व राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे या दोघांना मतदारांना होत असलेल्या पसेवाटप प्रकरणात अटक झाली. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. गंगाखेड मतदारसंघात पशाचे मोठय़ा प्रमाणात वाटप सुरू असल्याची ओरड झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला अखेर जाग आली व त्यांनी आमदारासह उद्योजकालाही अटक करण्याचे धाडस दाखवले. या कारवाईनंतर पसेवाटपाचा ‘खेळ’ बंद होईल, असे वाटत होते. परंतु उमेदवाराकडून हा ‘खेळ’ थांबविला जात नाही, हे रविवारी रात्रीच्या कारवाईवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गंगाखेडच्या राज मोहल्ला गल्लीत घनदाट यांच्या ऑटोरिक्षा या चिन्हावर मतदान करण्यासाठी पसेवाटप करताना शेख सुलेमान शेख पाशा व विकास मधुकर चाटे (पांढरगाव) यांना पकडून त्यांच्याकडून ५१ हजार १०० रुपये, घनदाट यांच्या प्रचाराचे साहित्य आणि खर्चाची नोंदवही पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलीस शिपाई श्रीकांत लांडगे यांच्या तक्रारीवरून सुलेमान व विकास या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. तपासात या दोघांनी अपक्ष उमेदवार घनदाट यांच्यासाठी नगरसेवक केंद्रे यांच्या सांगण्यावरून मतदारांना पसेवाटप करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे केंद्रेंनाही पोलिसांनी अटक करून त्यांची जामिनावर मुक्तता केली.