08 August 2020

News Flash

दहशतवाद्याला बनावट ‘ओळख’ देणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक

सीमी संघटनेच्या एका कट्टर दहशतवाद्याला ओळख नसतानाही बनावट नावाने ओळखपत्र देणाऱ्या माजी नगरसेवक म. मुखीद याला सिडको पोलिसांनी अटक केली.

| March 23, 2015 01:20 am

सीमी संघटनेच्या एका कट्टर दहशतवाद्याला ओळख नसतानाही बनावट नावाने ओळखपत्र देणाऱ्या माजी नगरसेवक म. मुखीद याला सिडको पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ‘लोकसत्ता’ने २४ फेब्रुवारी रोजी हे सर्व प्रकरण उघडकीस आणले होते. तब्बल १५ दिवसांनंतर केलेल्या या कारवाईचे स्वागत होत असले तरी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढावीत, अशी मागणी समोर आली आहे.
दहशतवादी कृत्यात उघड सहभाग नोंदवणाऱ्या व बंदी घातलेल्या सीमी संघटनेशी संबंधित असलेले म. खान इस्माइल खान, अमजदखान रमजान खान, अस्लम मोहमद अयुब खान, म. इजाजोद्दिन म.अजिजोद्दीन, जाकेर हुसेन बदरूल हुसेन व म.सलीम हे सहा अतिरेकी सुमारे दीड वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झाले होते. खांडवा येथे झालेला बाँबस्फोट व देशभरातील वेगवेगळ्या दहशतवादी कारवायात या सहा जणांचा सहभाग होता. सहापकी एक असलेल्या जाकेर हुसेन याची सासुरवाडी नांदेडची आहे. खांडवासह पुणे, उत्तरप्रदेशातील बिजूर व बंगळुरू येथे झालेल्या बाँबस्फोटात या सहाजणांचा सहभाग असल्याचा संशय एटीएस तसेच एनआयए या गुप्तचर संस्थांना आहे.
देशभरातील सर्वच गुप्तचर यंत्रणा या सहाजणांचा शोध घेत आहे. यातील एक आरोपी जाकेर हुसेन याने नांदेडातून सादिक खान या नावाने आधारकार्ड काढले. आधारकार्ड काढण्यासाठी त्याला तत्कालीन नगरसेवक म.मुखीद याने ओळखपत्र व रहिवासी प्रमाणपत्र दिले होते. कोणतीही ओळख नसताना किंवा त्याचे नांदेडात वास्तव्य नसताना म.मुखीद याने आपण त्याला दहा वर्षांंपासून ओळखत असल्याचे प्रमाणपत्र दिले. याच प्रमाणपत्राच्या आधारे त्याने नांदेडातून बनावट आधारकार्ड काढले.
कट्टर दहशतवाद्याला बनावट आधारकार्ड देण्यात आल्याची माहिती सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यानंतर खळबळ उडाली होती. राज्याच्या गृहविभागाने याची गंभीर दखल घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती काही महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर तत्कालीन नगरसेवक म. मुखीद याच्यासह सीमीचा कट्टर दहशतवादी जाकेर हुसेन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. म.मुखीद याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीधर पवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान पोलिसांनी उशिरा का होईना गुन्हा दाखल केला असला तरी या प्रकरणाची पाळेमुळे शोधावित अशी मागणी समोर आली आहे. म.मुखीद याने दिलेल्या सर्व प्रमाणपत्राची चौकशी करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2015 1:20 am

Web Title: corporator arrested in issue of terrorist fake identity card
Next Stories
1 दुष्काळी अनुदानासाठी लाच देणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अटक
2 नवीन पनवेलमध्ये चर्चवर दगडफेक
3 कुलगुरुपदाच्या मुलाखती वर्ध्यातच
Just Now!
X