समांतर जलवाहिनीच्या विषयावरून शुक्रवारी औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ उडाला. महापौरांसमोरील राजदंड पळविण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेसचे नगरसेवक प्रमोद राठोड यांना तो लागल्याने ते जखमी झाले. राठोड यांना उपचारांसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सभेमध्ये समांतर जलवाहिनीचा विषय निघाल्यानंतर सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सभा तहकूब करण्याचा महापौरांच्या निर्णयानंतर विरोधी सदस्यांनी त्यांच्या खुर्चीसमोर जाऊन आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली. यावेळी महापौरांसमोरील राजदंड नगरसेवकांनी उचलला. राजदंडाच्या ओढाओढीमध्ये तो प्रमोद राठोड यांच्या कपाळाला लागला. त्यामुळे त्यांच्या कपाळातून रक्त येण्यास सुरुवात झाली. यानंतर राठोड यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
औरंगाबाद महापालिकेच्या समांतर जलवाहिनीचे काम दिलेल्या कंत्राटदाराने नोटीस मुदत संपण्यापूर्वी पावले न टाकल्यास हे कंत्राट रद्द करून नव्याने देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारीच केली होती.