पुलवामा येथे जे जवान शहीद झाले त्याला तेरा दिवस उलटले. त्यादिवशीच सरकारने पाकिस्तानला चांगली अद्दल घडवली अशी प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. 14 फेब्रुवारीच्या दिवशी जम्मूतील पुलवामा या ठिकाणी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाचे चाळीस जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. ज्यानंतर आज पहाटे वायुदलाने  जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करून पाकिस्तानला हादरा दिला. या हवाई हल्ल्याचे देशभरात कौतुक होते आहे. मोहन भागवत यांनी नागपुरात बोलताना सरकारने योग्यच कारवाई केल्याचं म्हटलं आहे.

मंगळवारी भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली. भारतीय वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडे तीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हजार किलो बॉम्ब फेकले आणि तळ उध्वस्त केले. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जात आहे.

वायुदलाच्या या कारवाईनंतर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील सगळ्याच पक्षातल्या नेत्यांनी वायुदलाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. आत सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पाकिस्तानला योग्य उत्तर दिल्याचं म्हटलं आहे.