शहरातील खळवाडी, काशीराम नगर, जळगाव रोड विभागात ग्राहकांना देण्यात आलेल्या अवाजवी देयकांविरोधात शिवसेनेन आवाज उठविताच महावितरणने अनेक देयकांमध्ये दुरूस्ती केली आहे. तसेच शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी करून सुरळीत करण्याचे आश्वासनही अभियंत्यांकडून देण्यात आले आहे.

शहरातील महावितरणच्या अनागोंदी कारभाराबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली १६ जुलै रोजी  शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांच्याशी चर्चा केली. तक्रारी न सोडवल्यास महावितरण कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी खळवाडी परिसरातील भरत पाटील यांचे ४९०० रुपये, काशीराम नगर भागातील लक्ष्मण पाटील यांच्या नावाने असलेल्या आठ हजार रूपयांच्या देयकात दुरुस्ती करण्यात आली. श्रीनगर भागातील टोपेश महाजन, प्रदीप राणे यांना एक वर्षपासून दुसऱ्याच ग्राहकाचे देयक येत होते. त्यांचे मीटर बदलवून देण्यात आले. अशा प्रकारे भुसावळातील ६०० ग्राहकांच्या मीटरची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यापुढे नियमित वीज पुरवठा केला जाईल, असे लेखी अभियंता व्ही. बी. पाटील यांनी शिवसेना तालुका संघटक प्रा. धिरज पाटील, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख पवन नाले, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील यांना दिले. खंडित वीज पुरवठय़ाची ठोस कारणे ग्राहकांना समजली पाहिजेत. दुरूस्तीची कामे करतांना ग्राहकांना संदेश पाठविणे, दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करणे, विभागनिहाय तक्रार केंद्रे आणि संपर्क प्रसिद्ध करावे तसेच चुकी करणाऱ्या जीनस कंपनीच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशा मागण्या प्रा. पाटील यांनी केल्या आहेत.

भुसावळ रेल्वे विभागातर्फे वृक्षारोपण

भुसावळ रेल्वे विभागातर्फे पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात येत असून १६ जून ते १८ जुलै या कालावधीत सुमारे एक हजार ५७६ विविध प्रकारचे रोपे लावण्यात आली.

हा उपक्रम मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वरिष्ठ मंडळ पर्यावरण व्यवस्था प्रबंधक पी. रामाचंद्रन यांच्या देखरेखीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमात १६ जूनपासून झाडे लावण्याचे कार्य सुरु करण्यात आले आहे. जून महिन्यात ७२५ झाडे लावण्यात आली. तसेच जुलै महिन्यात १८ तारखेपर्यंत ८५१ झाडे लावण्यात आली. ही झाडे विविध प्रकारची असून त्यामध्ये सागवान, शिसम, गुलमोहर, कडुलिंब, पिंपळ, बदाम तसेच इतर वृक्षांचा समावेश आहे. ही रोपे भुसावळ मधील रेल्वे परिसरात लावण्यात येत आहे. त्यामध्ये ऑफिसर कॉलनी, स्काऊट गाईड, नेहरू रोड आणि इतर  ठिकाणांचा समावेश आहे. १० ते १२ विविध विभागातील कर्मचारी स्वत:हून या उपक्रमात सहभागी झाले आहेत. काही दिवसात अनेक झाडे भुसावळ मंडळाच्या वेगवेगळ्या स्थानकांवर लावण्यात येणार आहेत. भुसावळ मंडळामध्ये सध्या भुसावळ, मनमाड आणि बडनेरा या तीन ठिकाणी रोपवाटिका आहे.