जमिनीचा सुधारित सातबारा उतारा देण्यासाठी व त्या जागेची नोंद मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अलिबाग तहसील कार्यालयाचा अव्वल कारकून रविदास जाधव यास शुक्रवापर्यंत (दि. २७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. रविदास जाधव यास मंगळवारी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडून अटक केली होती. रविदास जाधव याच्याकडे रेवदंडा मंडळ अधिकारी म्हणूनही अतिरिक्त भार होता. तक्रारदार यांच्या डावाले, ता. अलिबाग येथील वडिलोपार्जित जागेचे आपआपसात वाटणीपत्र केलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून तक्रारदार यांचे काका यांचे नाव कमी करून त्या जमिनीचा सुधारित सातबारा उतारा देण्यासाठी व त्या जागेची नोंद मंजूर करण्यासाठी अलिबाग तहसील कार्यालयाचा अव्वल कारकून रविदास जाधव याने तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तक्रारदार यांची लाच देण्यास इच्छा नसल्याने त्यांनी अव्वल कारकून तथा रेवदंडय़ाचा मंडळ अधिकारी जाधव याचे विरोधात लाचेच्या मागणीबाबत दि. १८ मे रोजी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती.
त्यानंतर रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ मे रोजी अव्वल कारकून रविदास जाधव यांनी केलेल्या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीमध्ये रविदास जाधव याने तक्रारदार यांच्याकडे वेगवेगळ्या दोन कामांसाठी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलिबाग तहसील कार्यालयात सापळा लावला होता. अलिबाग तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात रविदास जाधव यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. रविदास जाधव यास बुधवारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला शुक्रवापर्यंत (दि. २७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यास्मीन इनामदार, पोलीस हवालदार दीपक मोरे, पोलीस नाईक जगदीश बारे, विशाल शिर्के, पोलीस शिपाई सूरज पाटील, अरुण घरत यांनी जाधववरील सापळा यशस्वी केला.