१५ वर्षांत आघाडी सरकारने १६ मोठे घोटाळे करून ११ लाख ८८ हजार कोटीचा भ्रष्टाचार केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळातील १६ भ्रष्ट मंत्र्यांची नावे माहीत असतानाही त्यांनी गुन्हे दाखल केले नाहीत. राज्यात भाजपचे सरकार आल्यास १६ भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात पाठविण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी दिला.
तुळजापूर मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय िनबाळकर यांच्या प्रचारार्थ कनगरा येथे प्रचारसभेत ते बोलत होते. तावडे म्हणाले, की आघाडी सरकारला भ्रष्टाचाराचा जणू छंदच होता, त्यामुळेच राज्य कर्जबाजारी झाले. राज्यावर सध्या ३ लाख कोटीचे कर्ज आहे. याचा अर्थ आज प्रत्येकाच्या डोक्यावर ७० हजार रुपये कर्ज आहे. राज्यात महिलांवर बलात्कार, अन्याय-अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महिलांचे रक्षण करू न शकणाऱ्या सरकारला पुन्हा संधी देऊन महिला भगिनींची अब्रू धोक्यात टाकण्याची चूक पुन्हा करू नका. राज्यातील शेतकऱ्यांचीही सध्या बिकट स्थिती आहे, असे ते म्हणाले. दारूविक्रीविरोधात लढा देणाऱ्या कनगऱ्यातील महिला, ग्रामस्थांना संरक्षण देण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोलीसरूपी गुंडगिरीने अमानुष मारहाण करून संत-महापुरुषांच्या महाराष्ट्राला लाजवले. या व्यवस्थेला धडा शिकविण्याऐवजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यांना अभय दिले, असा आरोपही तावडे यांनी केला.
िनबाळकर यांनी पालकमंत्री मधुकर चव्हाण यांच्यावर तुळजाभवानी कारखाना व जिल्हा बँक वाचविण्यास काहीही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप केला. पांडुरंग पवार यांनी सूत्रसंचालन केले.
दुधगावकरांच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन
उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय पाटील दुधगावकर यांनी केलेले सामाजिक कार्य व जि.प. उपाध्यक्षपदी रुजू झाल्यानंतर केलेल्या कामांची माहिती देणाऱ्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, उमेदवार दुधगावकर, अॅड. मिलिंद पाटील, दत्ता राजमाने उपस्थित होते.
बिघाड लक्षात आल्याने तावडे सुदैवानेच वाचले!
वार्ताहर, लातूर
भाजप नेते विनोद तावडे यांच्या हेलिकॉप्टरमधील बिघाड वेळीच लक्षात आल्यामुळे तावडे सुदैवानेच बचावले.
बुधवारी सायंकाळी लातूरहून घनसांगवी व फुलंब्री येथील सभेसाठी तावडे निघणार होते. हेलिकॉप्टर सुरू झाले आणि त्यातून तेलगळती होऊ लागली. निरोप द्यायला आलेल्या कार्यकर्त्यांना हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्यांनी पायलटला खुणावून सांगितले. पायलटने पाहणी करून तावडे व सहकाऱ्यांस तातडीने बाहेर काढले. हेलिकॉप्टर उडाले असते तर मोठा स्फोट झाला असता, अशी भीती पायलटने या वेळी बोलून दाखवली. तावडे यांना नांदेड माग्रे मुंबईला जावे लागले.