शहरातील शासकीय मुद्रणालयाच्या व्यवस्थापकास ४२ हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. मिलिंद शांताराम शिंदे (वय ४७, वडगाव शेरी, चंदननगर, पुणे, हल्ली औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे. मराठवाडय़ात लाचखोरीच्या घटनांमध्ये अलीकडे चांगलीच वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर तक्रारदारांसह नागरिकांनी भ्रष्टाचाराबाबत तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
मुद्रणालयात बांधणी सहायकारी या पदावर निवड झालेल्या व्यक्तीशी शिंदे याने सुरुवातीला संपर्क साधून नोकरी पाहिजे असल्यास ५ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर गेल्या वर्षी १९ मार्च रोजी तक्रारदारास ‘तुझी निवड केली आहे. तुला कधी हजर करून घ्यायचे, ते माझ्या हातात आहे. तुला वर्षभर रखडवून टाकीन,’ असे धमकावून ५ लाखांची मागणी केली. तडजोडीत १ लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने ४० हजार रुपये शिंदे याला दिले. त्यानंतर दोन दिवसांत तक्रारदारास बांधणी सहायक पदाचे नेमणूकपत्र मिळून तो औरंगाबादला रुजू झाला. मात्र, शिंदे याने उर्वरित पैशांची मागणी केली असता तक्रारदाराने गेल्या सप्टेंबरमध्ये १८ हजार रुपये दिले. परंतु यानंतरही शिंदे याने तक्रारदारास या पदासाठी निवड करून नोकरी दिल्याचे बक्षीस व पुढे काही त्रास होऊ न देण्यासाठी ४२ हजार रुपये दे, अन्यथा कोणत्याही कारणास्तव निलंबित करीन, अशी धमकी वारंवार दिली. तक्रारदाराने या बाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. विभागाने शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास लावलेल्या सापळ्यात शिंदे याला किरण चव्हाण यांच्यामार्फत लाचेची रक्कम घेताना पकडले.
दरम्यान, आरोपी शिंदे याने २००४मध्ये नागपूर येथे नेमणुकीस असताना कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून घराचे कर्जप्रकरण मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. तेव्हाही तो लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला होता.
शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या नंदापूरच्या तलाठय़ाविरुद्ध गुन्हा
वार्ताहर, जालना
वारसाहक्काने मिळालेली जमीन नावावर करून सात-बारा उताऱ्यावर तशी नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडे ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जालना तालुक्यातील नंदापूर येथील तलाठी किसन रामभाऊ खोतकर याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.
नंदापूर येथील नारायण उबाळे यांना वाटणीनुसार ४२ आर शेतजमीन मिळणार होती. ही जमीन नावावर करण्यासाठी उबाळे यांचा मुलगा वैजनाथ याने आवश्यक कागदपत्रे व संबंधित नातेवाईकांना घेऊन तलाठी खोतकर याची भेट घेतली होती. १५ दिवसांनंतर वैजनाथ उबाळे यांनी तलाठी खोतकरची तहसील कार्यालयात भेट घेतली असता त्याने या कामासाठी ७ हजार रुपये लागतील, असे सांगितले. उबाळे यांनी या संदर्भात लाचलुचपत विभागाच्या जालना कार्यालयात तक्रार केली. खोतकर याने तक्रारदारास सात हजार रुपये घेऊन घरी बोलावले. या वेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला. त्यावेळी खोतकरने तुझे काम झाले, असे सांगून तहसीलमधून सात-बारा उतारा काढण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने मोबाईलवरून पैशांबाबत विचारले असता तलाठय़ाने आता कशासाठी भेटतो, असे प्रश्न करून भेट घेण्यास नकार दिला. लाचलुचपत विभागाच्या तपासात खोतकरने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
अंगणवाडी पर्यवेक्षिकेला लाच प्रकरणात सक्तमजुरी
वार्ताहर, जालना
पोषण आहाराची बिले मंजूर करून वर पाठविण्यासाठी बचत गट अध्यक्षाकडून सातशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अंगणवाडी पर्यवेक्षिका सुषमा दीपवाल हिला वेगवेगळ्या कलमांखाली एक वर्ष सक्तमजुरी, तसेच साडेसातशे रुपये दंड अशा दोन स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आल्या. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जि. प. च्या आस्थापनेवर अंगणवाडी पर्यवेक्षिका दीपवाल हिने पोषण आहाराची बिले मंजूर करून पुढे पाठविण्यासाठी लाच मागितली, अशी तक्रार अंबड तालुक्यातील भणंग जळगाव येथील बचत गटाच्या अध्यक्षा गंगुबाई बुलबुले यांनी लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्यानंतर ५ जानेवारी २०१० रोजी सुखापुरी येथील अंगणवाडीत दीपवाल हिला लाच घेताना पकडले होते. जिल्हा व सत्र तथा विशेष न्या. आशुतोष एन. करमरकर यांनी आरोपीस वरील शिक्षा सुनावली. सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील उत्तम राठोड यांनी ८ साक्षीदार तपासले. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शालिग्राम वानखेडे यांचीही या प्रकरणी साक्ष झाली.
१५ हजारांची लाच घेताना औरादचा फौजदार अटकेत
वार्ताहर, लातूर
एका गुन्हय़ात अटक केलेल्या आरोपीची कमीतकमी कालावधीची पोलीस कोठडी मागण्यासाठी व कोठडीत चांगली वागणूक देऊन तपास आरोपीच्या बाजूने करण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील पोलीस उपनिरीक्षक महेश अंबादास गळकटे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
गळकटे याने २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यातील १० हजार रुपये पूर्वीच घेतले व उर्वरित १५ हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मध्यरात्री स्वीकारत असताना लातूर येथील लाचलुचपत अधिकाऱ्यांनी त्यास पकडले. पोलीस अधीक्षक एन. व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अंकुशकर यांनी हा सापळा रचला.