गरिबांच्या भल्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेला स्वत:च्या भल्यासाठी राबवण्याकरिता मृत व्यक्तींनाही कामावर दाखवण्यासारखे मार्ग शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी शोधून काढले आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वन विभागाच्या कामांमध्ये यासारख्या विविध प्रकारांनी भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही केंद्र शासनाकडून राबवली जाते. यवतमाळ जिल्ह्य़ातील झरी जामणी तालुक्यातील रोहयोच्या कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी २४ कोटी रुपयांची देयके थांबवली होती. याशिवाय, घाटंजी व पांढरकवडा तालुक्यातही हे गैरप्रकार झाले आहेत. रोहयोतील मजुरांच्या नावाने खात्यातील रक्कम काढणे, शासनाच्या ऑनलाइन मस्टरमधील मृत मजुरांची नावे हस्तलिखित मस्टरमध्ये लिहिताना खोडतोड करून नवीन नावे समाविष्ट करणे, काही मजुरांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कामे केल्याचे दाखवून त्यांची मजुरी काढणे, बनावट मस्टर तयार करणे आणि मजूर कामावर नसताना स्वत: परस्पर रक्कम काढणे, अशा विविध प्रकारांनी हा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
रोजगार हमी योजनेत काम देताना १८ वर्षांखालील व ६० वर्षांवरील व्यक्तींना मजूर म्हणून घेतले जात नाही, परंतु या प्रकरणात ७३ वर्षांच्या व्यक्तीलाही काम दिल्याचे दाखवले आहे.
मजुरांचे खोटे व बनावट मस्टर भरण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर टपाल कार्यालयातून मजुरांची रक्कम काढताना अंगठा असलेल्या व्रिडॉवल स्लीपवर साक्षीदाराची खोटी सही करून बनावट शिक्का वापरल्याचेही प्रकार घडले आहेत. ‘एकमेका साह्य़ करू, अवघे धरू सुपंथ’ या तत्त्वावर अनेक जण या भ्रष्टाचाराच्या साखळीत गुंतले आहेत.
प्रामुख्याने घाटंजी व पांढरकवडा तालुक्यातील आणि वन विभागाच्या कामांशी संबंधित काही प्रकरणांचे पुरावे ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीच्या हाती लागले आहेत. पारवा येथील आनंदराव देवराव वरगंटवार यांना १ ते १२ फेब्रुवारी २०१२ या कालावधीत माणुसधरी येथील रोहयोच्या नालाबंध कामावर दाखवून त्यासाठी ५ हजार ४७२ रुपये मजुरी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्यांचा २० ऑगस्ट २००८ रोजीच मृत्यू झाला आहे. ऑनलाइन मस्टरवर त्यांचे नाव आहे, तर हस्तलिखित मस्टरवर खोडतोड करून त्यांची पत्नी अनसूया हिचे नाव टाकण्यात आले आहे. पारवा येथील रमेश गंगाराम तोडसाम यांना १ ते १५ फेब्रुवारी २०१२ पर्यंत माणुसधरी येथील कामावर दाखवून त्यांना ४ हजार १०४ रुपये मजुरी दिल्याचा रेकॉर्ड तयार करण्यात आला आहे. मात्र, तोडसाम हे २६ सप्टेंबर २०१० रोजीच मरण पावले आहेत. ऑनलाइन मस्टरवर त्यांचे नाव असले तरी हस्तलिखित मस्टरवरून ते गायब केलेले आहे.
जांब येथील पुनाजी आनंदराव पुसणाके यांचा २८ सप्टेंबर २००८ रोजी मृत्यू झाला. मात्र त्यांना ५ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१२ या कालावधीत जांब रोपवाटिकेत कामावर दाखवून २३०६.५० रुपये मजुरी अदा करण्यात आली. ऑनलाइन मस्टरवर त्यांचे नाव असताना हस्तलिखित मस्टरवर मात्र त्यांची पत्नी कमलाबाई हिचे नाव नमूद आहे.
    (पूर्वार्ध)

पोस्ट मास्तरांकडून वसुली
 कुर्ली येथील मीराबाई किनाके, बेबी चव्हाण, सरस्वती गुरनुले, पार्वता पुसणाके, अनसूया गुरनुले, गणपत संगणवार यांनी माणुसधरी किंवा इतर ठिकाणी रोहयोची कामे न करताही मोहदा येथील टपाल कार्यालयातून मजुरीचे पैसे काढून शासनाची फसवणूक केली आहे. कुर्ली येथील रोहयो मजुरांची खाती मोहदा टपाल कार्यालयात उघडली असताना ऑनलाइन मस्टरमध्ये मात्र कुर्ली टपाल कार्यालयात खाते उघडल्याचे नमूद केलेले आहे. मीराबाई किनाके हिच्या नावावर काढण्यात आलेली ५४२४ रुपयांची रक्कम टपाल खात्याने चौकशीनंतर तत्कालीन पोस्ट मास्तरांकडून वसूल केली, ही बाब भ्रष्टाचार झाला, यास दुजोरा देणारी आहे.

Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
millions of old vehicles running on pune road no re registration after fifteen years
पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहने! पंधरा वर्षे होऊनही पुनर्नोंदणी नाही
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार