News Flash

कोल्हापूर जिल्ह्यात करोना साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा झाल्याचा भाजपाचा आरोप

भाजपाने पत्रकार परिषदेत घेऊन करोना साहित्य खरेदीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केलीय

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि गुगल मॅप्सवरुन साभार)

कोल्हापूर जिल्ह्यात करोना साहित्याची ८८ कोटींची खरेदी करण्यात आली. चढ्या दराने सर्वच साहित्य खरेदी करण्यात आली. या खरेदीत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मंगळवारी भाजपने पत्रकार परिषदेत केला. या गैरव्यवहारावर लेखापरीक्षनात गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजकीय वरदहस्ताने हा घोटाळा झाला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना साहित्यातील घोटाळा प्रकरण सातत्याने गाजत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या घोटाळ्याची चौकशी होण्याची मागणी केली आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन करोना साहित्यातील घोटाळ्यासंदर्भातील सविस्तर तपशील प्रसार माध्यमांसमोर मांडला केला. यावेळी किसान सभेचे अध्यक्ष भगवान काटेही उपस्थित होते.

निंबाळकर म्हणाले, ८८ कोटी रुपयांची खरेदी करण्यात येऊन त्याची बिले अदा करण्यात आली आहेत. आणखी ४५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र ही सर्व खरेदी शासनाचे नियम डावलून मनमानी पद्धतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्यचिकित्सक यांच्या समितीने ही खरेदी केली आहे. समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व कंत्राटी आरोग्य अधिकारी नितीन लोहार यांच्या स्वाक्षरीने बिले देण्यात आली आहेत. अनेक पात्र कंपन्यांना डावलून राजकीय हितसंबंध असणाऱ्या लोकांच्या कंपन्यांकडून खरेदी केली असल्याचे आरोप भाजपाने केले आहेत.

थर्मल स्कॅनरची किंमत अकराशे रुपये असताना ते दहा हजार रुपयांना खरेदी करण्यात आले. मास्क सुरुवातीला दोनशे पाच रुपयांनी खरेदी केले नंतर ते केवळ १४ रुपयाला खरेदी केली. हँडसनीटायझर सुद्धा प्रारंभी अडीचशे रुपये अर्धा लिटर खरेदी केले तर नंतर ते ६० रुपये लीटरला खरेदी केले. पीपीई किटमध्ये ही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. बाजारात तीनशे पन्नास रुपयाला कीट मिळत असताना येथे सतराशे रुपयांनी खरेदी केलेली आहे. जिल्ह्यात साडेतीन हजार बेड खरेदी केले आहेत. बाजारात सात हजार २२५ रुपयांना बेड मिळत असताना साडेबारा हजार रुपये प्रती बेड दराने खरेदी केली आहे. करोना संसर्ग वाढला असताना जिल्ह्यात रुग्णांना बेड उपलब्ध नाही असे सांगितले जात होते. मग इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले बेड गेले कुठे? जिल्हा परिषद सदस्यांच्या पुतण्याला बेड अभावी जीव गमवावा लागला होता. त्यामुळे बेडच्या नियोजनात कोणाचा कोणावर वचक नव्हता. लोकांची थट्टा करण्याचे काम प्रशासनाने केले आहे,अशी टीका निंबाळकर यांनी केली.

ऑक्सीजन सिलेंडर नऊ हजार ५७४ ला मिळत असताना ते १३ हजार ७०० रुपयांना खरेदी केले आहे. अशा अनेक वस्तूंमध्ये चढ्या दराने खरेदी करून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आहे.
एकूण खरेदी ८८ कोटींची झाली आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के रकमेचा घोटाळा झाला आहे. भ्रष्टाचाराची रक्कम ३५ कोटी रुपये आहे, असा आरोप निंबाळकर यांनी केला. या मागे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या वरदहस्त असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या पोर्टलवर कमी दराने साहित्य मिळत असताना गडबडीने चढ्या दराने खरेदी करून करदात्या जनतेच्या लूट उघडपणे झाली असून त्याची चौकशी करावी अशी मागणी आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशीचे निवेदन अमित शहा, देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यासंदर्भातील मेल केला आहे, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 2:41 pm

Web Title: corruption in kolhapur during corona equipment purchase says bjp scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “२१ फेब्रुवारीचं फेसबुक लाईव्ह सर्वोत्कृष्ट होतं, कारण…”; उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा उपहासात्मक टोला
2 “जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा, ३०९०० जणांचे प्राण वाचवता आले असते जर…”; फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल
3 पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यापेक्षा सेस कमी करावा, कारण…-रोहित पवार
Just Now!
X