अगदी आठच दिवसापूर्वीची गोष्ट. रेशीमबाग मैदानावर भरलेल्या संघ परिवारातील शिक्षक संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात माजी महापौर कल्पना पांडे भाजपचा उच्चविद्याविभूषित चेहरा म्हणून व्यासपीठावर अगदी आत्मविश्वासाने वावरत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या संमेलनात संचालन करताना या महिलेने जे शिक्षणविषयक विचार उद्धृत केले ते बघून अनेकांचे डोळे दिपले. याच संमेलनात फडणवीस व गडकरी यांनी शिक्षणक्षेत्रातला डावा विचार मोडून काढण्याची गरज व्यक्त करतानाच उजव्या विचाराचा आग्रह धरला होता. त्यावरील चर्चा अजून शमलेली नसताना या पांडेबाई अलीकडेच ५० हजाराची लाच मागताना रंगेहात पकडल्या गेल्या. आता या पांडेबाईंना उजव्या विचारसरणीचे प्रतीक समजायला काय हरकत आहे? अशा तकलादू प्रतीकांच्या बळावर संघ परिवाराला उजवा विचार शिक्षणात रुजवायचा असेल तर देशातील शिक्षण पद्धतीचे भवितव्य अंधकारमय आहे, असेच समजावे लागेल. याच कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी शिक्षणात विवेकानंदांच्या विचारांचा आग्रह धरला होता. असे लाचखोर लोक विवेकानंदांचा विचार रुजवू शकतील काय?, यावर आता गडकरींनाच चिंतन करावे लागेल.
भाजपच्या पहिल्या महापौर, पक्षाचा शिक्षित चेहरा, हिंदीभाषी मतांवर हुकमत, अशी अनेक विशेषणे या महिलेच्या मागे लावण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी क्रीडा साहित्य घोटाळ्यात त्या अडकल्या, पण पक्षातील त्यांचे महत्त्व जराही कमी झाले नाही. आता तर त्या रंगेहातच सापडल्या. सामान्य जनतेला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणाऱ्या या बाई पैशाला किती महत्त्व देतात व शिक्षण त्यांच्यासाठी किती गौण आहे, हेच यातून दिसून आले. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला त्यांचेच मातृस्थान असलेल्या या शहरात सध्या बरे दिवस नाहीत. आधी भाजयुमोचा उपाध्यक्ष ऊर्फ गुंड सुमीत ठाकूर पकडला गेला. आता कल्पना पांडे. ठाकूर हा नामचीन गुंड व अट्टल गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्या बचावासाठी भाजप नेत्यांना जाहीर धावपळ करणे जमले नाही. लाचखोर पांडे मात्र पांढरपेशे गुन्हेगार या सदरात मोडतात. त्यामुळे त्यांच्या बचावासाठी नेत्यांची फौज उभी राहिली. पांडेबाई कशा निर्दोष आहेत, हे ठासून सांगणारे शहरभर फिरले. लाचखोराच्या पाठीशी उभा राहणारा भाजप, अशी पक्षाची प्रतिमा होऊनही या पक्षाचे नेते या महिलेचे समर्थन करीत राहिले. भाजप खरोखरच इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे, हे यातून पुन्हा सिद्ध झाले. शिक्षणव्यव्स्थेवर आजवर काँग्रेसने, त्या पक्षातील डाव्या विचारवंतांनी प्रभाव गाजवला, हा भाजपचा सध्याचा मुख्य आक्षेप आहे. पूर्ण बहुमताने सत्तेत आलेल्या या पक्षाला असा आक्षेप घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. बहुमताच्या बळावर या व्यवस्थेचे उजवेकरण करण्याचाही त्यांना हक्क आहे. मात्र, हे सगळे प्रयत्न हा पक्ष कल्पना पांडेंसारख्यांना सोबत घेऊन करणार आहे का? तसे होत असेल तर या विचाराच्या उजवीकरणात लाचखोरी कुठे बसते, हे एकदा या पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट करणे भाग आहे. शिक्षणक्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्यामुळे आम्ही या क्षेत्रात कधीच उतरणार नाही, असे भाजपचे नेते आवर्जून सांगायचे. अनेकांनी हे पथ्य पाळले. मात्र, आज हाच पक्ष पांडेंची कड घेत असेल, आजवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वळचणीतला असलेल्या शिक्षण सम्राटांना पक्षात मानाचे स्थान देत असेल, तर यांना या क्षेत्रातील गैरव्यहाराचे काहीच वावडे नाही, असाच त्याचा अर्थ निघतो. स्वत: पथ्ये पाळायची आणि संगतीला भ्रष्टांची फौज ठेवायची, यात वेगळेपणा काय, याचेही उत्तर आता भाजपकडून घेण्याची वेळ आली आहे.
आणखी एक शिक्षण सम्राट दीपक बजाजचे प्रकरण गाजते आहे. या बजाजांनी तर शिक्षण संस्थेला ‘हमारा बजाज’ चे रूप देऊन टाकले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांची संपत्ती मोजता मोजता नाकात दम आला. या बजाजांचे चारशे कोटींचे व्यवहार बघून अनेकांवर डोळे पांढरे होण्याची वेळ आली. या शिक्षण सम्राटाने संस्थेचा फायदा करून घेण्यासाठी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना वापरून घेतले. शिक्षणक्षेत्रात उच्चशिक्षितांकडून होणारी ही आर्थिक लूट व राजकारण्यांकडून त्यांना मिळणारे समर्थन, त्याचा केला जाणारा गौरव, यामुळेच शिक्षित तरुणांमध्ये कमालीचे नैराश्य आले आहे. नोकरीच्या संधी देऊ, असे सांगणारे राजकीय नेते आतून कसे या शिक्षण सम्राटांना मिळालेले असतात, हेच या दोन प्रकरणांनी दाखवून दिले आहे. या बळावर शिक्षणक्षेत्रात ‘अच्छे दिन’ येतील का, असा प्रश्न आता सत्ताधाऱ्यांना विचारण्याची वेळ आली आहे. ‘विद्या विनयेन शोभते’ असे एक सुभाषित आहे. आता या विद्येच्या क्षेत्रात विनय उरलाच नाही. उर्मट, अहंकारी, पैशाने राजकारणीच नाही, तर काहीही विकत घेता येते, अशी भाषा करणारे शिक्षण संस्थाचालक यांचीच सध्या चलती आहे. त्यांनाच सत्ताधाऱ्यांकडून मान्यता मिळू लागली आहे. अशा वेळी बजाज व पांडेंविरुद्ध तक्रार करणाऱ्या पीडितांनी जायचे कुठे? कल्पना पांडेंना जामीन मिळावा म्हणून धावपळ करणाऱ्या भाजप नेत्यांना बघून या महिलेविरुद्ध तक्रारीचे धाडस दाखवणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या मनात कोणती भावना निर्माण झाली असेल? शिक्षणातील डावा विचार हद्दपार करायला निघालेले फडणवीस व गडकरी जरा या प्रश्नांवर विचार करतील का? –