कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला झाल्याची चुकीची माहिती पुढे येत असून त्यात काहीही तथ्य नाही. बँकेच्या पेमेंट स्वीचवर मालवेअर या व्हायरसचा अटॅक झाल्याने ९४ कोटी ४२ लाख रुपये परदेशात वळवण्यात आले. यामध्ये कोणत्याही बँक खात्यावरून पैसे कमी झालेले नाहीत, त्यामुळे खातेदारांनी घाबरुन जाऊ नये. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बँकेची सर्व एटीएम पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली.

काळे म्हणाले, भारत, कॅनडा आणि हाँगकाँगसह २९ देशांतील विविध एटीएम सेंटरमधून पैसे काढल्याचा प्रकार घडला आहे. यांपैकी १२ हजारांहून अधिक व्यवहार परदेशातून झाले आहेत. तर २ हजार ८०० व्यवहार हे भारतातून झाले आहेत. यातील पहिला व्यवहार हा कॅनडामध्ये झाल्याची माहिती पुढे येत आहे. या सर्व व्यवहाराचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. ९४ कोटींच्या व्यवहाराची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आली असून त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकारामागे मोठी आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारी यंत्रणा कार्यरत असावी अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

एटीएम सेंटरवरून डेबिट कार्ड, रुपे, व्हिसा कार्डचा वापर करून पैसे काढण्यात आले असून त्यामुळे बँकेच्या कोणत्याही खात्यामधील पैसे कमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व खातेदाराचे पैसे सुरक्षित असून खातेदारांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहनही अध्यक्ष काळे यांनी केले आहे.