News Flash

‘पांढरे सोने’ काळवंडले, धान्योत्पादनालाही ग्रहण!

उत्पादन घटले व भावही नाही, या कोंडीत कापूस उत्पादक यंदा भरडला. निसर्गाने मारले नि सरकारने वाऱ्यावर सोडले, अशीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकूण अवस्था आहे. पिकाचा

| January 30, 2013 12:24 pm

उत्पादन घटले व भावही नाही, या कोंडीत कापूस उत्पादक यंदा भरडला. निसर्गाने मारले नि सरकारने वाऱ्यावर सोडले, अशीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकूण अवस्था आहे. पिकाचा खर्च व मिळणारे उत्पन्न याचा प्रत्यक्ष ताळमेळ यंदा साधलाच गेला नाही. दोन वर्षांपूर्वी क्विंटलला सात हजार रुपयांपर्यंत भावपातळी गाठलेल्या ‘पांढऱ्या सोन्या’ने नंतरच्या पर्वात मात्र शेतकऱ्यांची चांगलीच निराशा केली. यंदा तर पिकाचा खर्चही वसूल झाला नाही. केवळ कापसाचेच गणित चुकले असे नाही, तर गहू, ज्वारी, हरभऱ्याच्या पिकांनीही शेतीचे अर्थकारण व शेतकऱ्यांचे जीवनमान पुन्हा अनिश्चिततेत लोटले.
औरंगाबाद विभागात सुमारे १० लाख हेक्टर क्षेत्रात यंदा कापूस उत्पादन घेतले गेले. मागील वर्षीच्या तुलनेत क्षेत्र वाढले असले, तरी कमी पाण्यामुळे उत्पादकता मात्र निम्म्याने घटली. औरंगाबाद जिल्हय़ात चार लाख, जालना व बीड प्रत्येकी तीन लाख हेक्टरप्रमाणे कपाशी उत्पादन घेण्यात आले. निम्म्याने उत्पादन घटल्याने पिकासाठी केलेला खर्चही वसूल होणे अवघडच. कापसाचा अनुभव असा विचित्र राहिला. ज्वारी, गहू, हरभरा पिकांबाबतही शेतकऱ्यांना कमी-अधिक हेच चित्र अनुभवण्यास मिळाले. ज्वारी-हरभऱ्याची उत्पादकताही निम्म्याने घटली, तर गव्हाच्या उत्पादनातही २५-३० टक्केघट अपेक्षित आहे.
कापसाच्या अर्थकारणावर मागील वर्षीप्रमाणेच यंदाही सुरुवातीपासूनच निराशेचे ढग दाटले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाला अपेक्षित उठाव व भावही नसल्याचे चित्र आहे. गेल्या ऑक्टोबरपासूनच कमी-अधिक फरकाने ही स्थिती असून, कापूस पिकाचा ढासळता डोलारा सावरण्यासाठी सरकारनेच आता व्याजरहित कर्जाची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पिकाचा विमा, बीटी कॉटन वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावे, असाही शेतकऱ्यांमधील सूर आहे. विदर्भाबरोबरच मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात, प्रामुख्याने नगर जिल्हय़ाच्या काही तालुक्यांत गेल्या काही वर्षांत कापूस उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. ऊस, कांदा पिकांसह पैसा देणारे नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते.
गेल्या वर्षी साडेचार हजार रुपये क्विंटल भाव कापसाला मिळाला. यंदा मात्र कमी पावसामुळे उत्पादन व उत्पादकताही जवळपास निम्म्याने घटली. भावपातळीही घसरली. परिणामी, खर्चाचे व उत्पन्नाचे गणित जुळू शकले नाही. एकरी जेमतेम दोन क्विंटल उत्पादन मिळू शकले. या पिकासाठी एकरी सहा-सात हजार रुपये केलेला खर्च, तुलनेत मिळालेला ३८०० रुपये भाव पाहता ‘ना नफा ना तोटा’ हे सूत्रही आवाक्याबाहेरचे ठरले. गेली काही वर्षे चांगले उत्पादन व वाढलेले भाव यामुळे पांढरे सोने शेतकऱ्याला चांगलेच वरदायी ठरले होते, परंतु कमी पाऊस व पाणीटंचाईमुळे शेतीतील अनिश्चिततेचा फेरा यंदा कापूस पिकाला विलक्षण ग्रासणारा ठरला.
एकीकडे कांद्याचे भाव तेजीत असताना कापसाच्या भावाने मात्र मान टाकल्याने शेतकरी काळजीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सध्या पाकिस्तानच्या कापसाने भारतीय कापसावर वरकडी केल्याचे चित्र आहे. पाकिस्तानमध्ये उत्पादन वाढले व तुलनेने जास्त कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल झाला आहे. चीनमध्ये यंदा कापसाचे उत्पादन घटले व तेथे मागचाच साठा पडून आहे. त्यातच भाव नसल्याने तेथील कापूस अजून बाजारात आला नाही. त्याचा फायदा पाकिस्तान, बांगलादेश या देशांनी उठविला. चीनमधून उठाव नाही, भारतातही उत्पादन घटलेले. भाव नाही व मागणीही नाही. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात मागील वर्षीपेक्षा कमी, क्विंटलला अवघा ३८०० रुपये भाव कापसाला मिळत आहे. अमेरिका, ब्राझीलचा कापूसही भाव कमी असूनही जास्त प्रमाणात बाजारात दाखल झाला.
भारतातून या हंगामात आतापर्यंत २०-२२ लाख गासडय़ा कापसाची निर्यात झाली. मागील वर्षी याच वेळेत ३० लाख गासडय़ा निर्यात झाली होती. मागील वर्षी क्विंटलला साडेचार हजार रुपये भाव होता, मात्र वर्षभरात इंधन व इतर तत्सम खर्च बराच वाढला. कमी पावसामुळे यंदा उत्पादन निम्म्याने घटले. भाव नाही व उठावही नाही, असे एकूण चित्र आहे. येत्या एप्रिलपर्यंत निर्यात वाढण्याची शक्यता असली, तरी भावपातळी कितपत हात देईल, याबाबत साशंकता आहे.

दृष्टिक्षेपात अर्थकारण
*  कापसाला उठाव नाही, भावात चढउतार नाही.
*  निर्यातीचे प्रमाण कमी, परकीय चलन घटले.
*  क्विंटलला ३८०० रुपये भाव.
*  इंधन खर्च वाढूनही पीक खर्च व उत्पन्नाचे गणित व्यस्त.
*  ज्वारी, हरभरा उत्पादनातही ५० टक्केघट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:24 pm

Web Title: cotton farmer in worse condition
Next Stories
1 अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य दुधखुळेपणाचे – आठवले
2 अन्नातील विषबाधेवरून शिक्षण मंडळाची सारवासारव, तर महापौरांची कठोर भूमिका
3 अलिबाग- पेण रेल्वेमार्गासाठी आज दिल्लीत बैठक
Just Now!
X