गेल्या काही दिवसांपासून विदर्भात कापसाच्या भावाचे उच्चांक पहायला मिळत असून, अनेक भागात कापसाला ५ हजार २०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत भाव मिळू लागला आहे. गेल्या वर्षी हंगाम संपेपर्यंत कापसाचे भाव चार हजार रुपयांपलीकडे गेले नव्हते. कमी उत्पादन, आंतरराष्ट्रीय बाजारात आणि कापड उद्योगांमध्ये वाढती मागणी आणि बदलत्या अर्थकारणाचा प्रभाव यामुळे कापसाला चांगले दिवस आले असले, तरी हे चित्र कायम राहील काय, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
कापूस हे विदर्भातील महत्वाचे नगदी पीक आहे. चांगले दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांचा कल कपाशीकडे पुन्हा वळला आहे. मात्र, यंदा नैसर्गिक संकटामुळे कपाशीच्या पिकांची हानी झाली. अनेक भागात कमी उत्पादन झाले. यंदाच्या खरीप हंगामात राज्यात ३८ लाख ७० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्यात सर्वाधिक १७ लाख २० हजार हेक्टर मराठवाडय़ात, त्या खालोखाल १२ लाख ३७ हजार हेक्टर लागवड विदर्भात, तर ६ लाख ९५ हजार हेक्टर लागवड खान्देशात झाली. सुरुवातीला दमदार पावसामुळे राज्यभरातून ८५ लाख कापूस गाठींच्या उत्पादनाचा पल्ला सहजपणे गाठला जाईल, असा अंदाज कापसू खरेदीदारांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अतिवृष्टीने चांगल्या उत्पादनाच्या आशेवर पाणी फिरवले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वधारल्याने स्थानिक बाजारपेठांवर त्याचा प्रभाव दिसून येत असून, अमरावतीतील एदलजी, नेमानी, मालपाणी इत्यादी प्रमुख जिनिंगमध्ये दलालांमार्फत ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये प्रती क्विंटल भावाने कापसाची खरेदी करण्यात आली. दलालांमध्ये कापूस खरेदीसाठी चढाओढ पहायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्य़ातील जाम येथील श्रीनिवास जिनिंगमध्ये ५ हजार २५१ रुपये, तर सुदर्शन कॉटन इंडस्ट्रिजने ५ हजार २२५ रुपये भाव मिळाला. आगामी काही दिवसात कापसाचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनकडून व कापड उद्योजकांकडूनही मोठी मागणी आहे. त्याचा प्रभाव कापसाच्या अर्थकारणावर झाला आहे.
गेल्या काही वषार्ंत कापसाला चांगला भाव मिळत असला, तरी उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने नफ्यात वाढ होऊ शकलेली नाही. प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्याच्या कापूस उत्पादनात यंदाच्या हंगामात १० टक्के घट होण्याची शक्यता महाराष्ट्र कॉटन ब्रोकर असोसिएशनने वर्तवली होती. विदर्भातील कापसू पट्टय़ात १० लाख कापूस गाठींनी उत्पादन घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यापेक्षाही जास्त घसरणीचे चित्र यंदा आहे. सध्या बाजारात छोटय़ा आणि मध्यम शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला आहे. साठवणुकीची जादा क्षमता असलेले मोठे शेतकरी अधिक भाववाढीची वाट पाहत आहेत. खेडा खरेदी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. व्यापाऱ्यांना मात्र यंदा कापूस मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यंदा वेळेपूर्वीच कापूस हंगाम आटोपण्याची शक्यता आहे.
गोंधळाची स्थिती
यंदा जागतिक पातळीवर कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. चीन, अमेरिका आणि ब्राझील या बडय़ा कापूस उत्पादक देशांना अल्प उत्पादनाचा फटका बसला आहे. येत्या काही दिवसात कापसाचे दर अधिक वाढतील, असे सांगण्यात येत असले, तरी हा आलेख केव्हा स्थिर होईल आणि केव्हा कोसळेल, याचा अंदाज येत नसल्याने शेतकऱ्यांमध्येही गोंधळाची स्थिती आहे.