हंगाम सुरु होऊन पंधरा दिवस लोटले तरी अद्यापही कापसाला अपेक्षित झळाळी मिळाली नाही. अजूनही कापूस पाच हजार रुपयांवरच रेंगाळलेला आहे. यात किंचित वाढ झाली असली तरी अद्यापही ती पुरेशी नाही. कापसाचे बाजारभाव संघटितरीत्या पाडण्याची खेळी दरवर्षीच खेळली जाते. यंदाही तेच चित्र पहायला मिळत आहे. यावर्षी कापसाचा भाव चांगला राहील, या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांना अजून तरी अपेक्षित भाव मिळताना दिसत नाही.

मंगळवारी सेलूच्या बाजारपेठेत कापसाला ५२०० रुपयांचा भाव मिळाला. हा भाव सध्याच्या कापसावर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत तोकडा आहे. लागवडीपासून वेचणीपर्यंत कापसावर होणारा खर्च पाहू जाता कापसाला किमान सहा ते सात हजार रुपये प्रतििक्वटल अशा बाजारभावाची गरज आहे. सध्या शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नसल्याने अजूनही बाजारपेठेत कापसाची आवक कमीच होताना दिसत आहे. यंदा कापसाचे लागवडीखालील क्षेत्र घटले असले तरीही कापसाचे उत्पादन मात्र चांगले होत आहे. अशावेळी चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. सध्या कापसाची खरेदी केवळ खाजगी व्यापाऱ्यांमार्फत सुरु आहे. अशा खरेदीत कापसाचे भाव कुठवर नेवून ठेवायचे आणि एका मर्यादेपर्यंत नेवून ठेवल्यानंतर ते पुढे जाऊच द्यायचे नाहीत, असा प्रकार व्यापाऱ्यांकडून संघटितरीत्या होतो. ठरवून कापसाचे भाव पाडलेही जाऊ शकतात आणि जेव्हा आवक कमी असते तेव्हा आवक वाढण्यासाठी काही अंशी बाजारभावात किंचित सुधारणा झाल्याचेही पहायला मिळते. अद्यापही कापसाची खरेदी खाजगी व्यापाऱ्यांकडूनच होत असल्याने सध्या तरी बाजारपेठेत कापसाला समाधानकारक भाव नसल्याचे दिसून येत आहे.

‘सीसीआय’ मार्फत जर कापसाची खरेदी सुरु झाली तर बाजारभावात वाढ होऊ शकते. मात्र अजूनही जिल्ह्यात कापसाची खरेदी सीसीआयमार्फत सुरु झालेली नाही.

खुल्या स्पध्रेत कापसाचे भाव वाढण्यासाठी सीसीआयची खरेदी आवश्यक असताना अजूनही बाजारपेठेत कापूस खरेदीसाठी ‘सीसीआय’ उतरले नाही. परिणामी शेतकऱ्यांना फटका बसत आहे. एवढेच नाही तर नाफेडने जिल्ह्यात मूग खरेदीसाठी जी तीन शासकीय खरेदी केंद्रे सुरु केली तीही आता बंद करण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना कमी किमतीत मूग विकावा लागत आहे. अद्याप सीसीआयची खरेदी चालू न झाल्याने अजूनही बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजारात आणला नाही. दुसरीकडे पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर कापसाचा पत्ताच नाही.

जिल्ह्यातल्या तिन्ही खरेदी केंद्रावर सध्या कापूस दिसत नाही. पणन महासंघाने ४१६० रुपये एवढा दर दिला. खुल्या बाजारात कापसाची किंमत अधिक असल्याने पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर शुकशुकाट जाणवत आहे. खाजगी व्यापारी पाच हजाराच्या आसपास भाव देत असताना पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकणारच नाहीत हे उघड आहे. भरीस भर म्हणून नोटा बंदीचाही फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.