इन्सुली सूतगिरणी जमीन प्रश्न प्रलंबित असताना सातबारावर नोंद करण्यात आल्याने सूतगिरणी जमीनमालक व संघर्ष समितीने तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले. या आंदोलनप्रसंगी २४ तासांत आपणास वस्तुस्थितीदर्शक माहिती देतो असे तलाठी कुडतरकर यांनी सांगितल्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान गावाचा विरोध डावलून दलालांना मदत करणाऱ्या एका स्थानिक लोकप्रतिनिधीला लोकांनी धारेवर धरत भंडावून सोडले.
इन्सुली सूतगिरणी जमीन पुन्हा शेतकऱ्यांना मिळावी म्हणून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सातबारावर खरेदीदारांची नावे चढवू नये म्हणून हरकती घेण्यात आल्या होत्या. तसेच शासकीय कोटय़वधी रुपयांची थकबाकी वसूल झाली नसल्याने सातबाऱ्यावर नाव नोंदवू नये अशी मागणी करूनही तलाठी सरगर यांनी सातबारावर नाव नोंदले असल्याने शेतकऱ्यांनी टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला होता.
इन्सुली तलाठी कार्यालयाला सकाळी १० वा. शेतकरी व संघर्ष समितीने टाळे ठोकले. यावेळी तलाठी कुडतरकर बाहेरच उभे राहिले होते. हे आंदोलन दडपण्यासाठी मोठय़ा प्रमाणात फौजफाटा व आंदोलकांना उचलून नेण्यास पोलीस व्हॅन आणून ठेवली होती. पोलीस निरीक्षक सुनील पालांडेसह राखीव दलही उपस्थित होते.
तलाठी कार्यालयाला संघर्ष समिती अध्यक्ष विकास केरकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विष्णू परब, शेतकरी रमेश नाटेकर, सखाराम बागवे, उल्हास हळदणकर, न्हानू कानसे, बंडय़ा पालव, नलू मोरजकर, बंडय़ा हळदणकर, उल्हास सावंत, बाबी नाईक, शिवाजी सावंत, आनंद राणे, संतोष परब, सुभाष मुळीक, अर्पिता राणे, सत्यभामा राणे, बबिता राणे यांच्यासह सुमारे ७० शेतकरी ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्यापूर्वी कार्यकारी दंडाधिकारी सावंतवाडी यांनी आंदोलकांना पत्र दिले होते. तलाठी कुडतरकर यांनी आपण आजच हजर होत असल्याने सातबारावर नाव नोंदले आहे. त्याची २४ तासांत लेखी माहिती देतो, आंदोलन मागे घ्या असे सांगितले. त्यानुसार आंदोलनाचे अध्यक्ष विकास केरकर यांनी साधकबाधक चर्चा केली.
इन्सुली सूतगिरणी जमीनमालकांनी कवडीमोलाने जमीन देताना परत मिळण्याचा हक्क राखून ठेवला होता. पण ही जमीन परस्पर बनावट लिलावाने बिल्डर्सच्या घशात घालण्यात आल्याने सातबारावर नाव नोंदणीस हरकत घेतली होती. पण तलाठी सरगर यांनी हरकतीबाबत काहीही कल्पना देण्याचे टाळत एका रात्रीत शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरविला असल्याने तलाठी कार्यालय टाळेबंद आंदोलन उभारले होते, असे विकास केरकर म्हणाले.
यावेळी बोलताना रमेश नाटेकर यांनी, आमच्या भावना जमिनीशी निगडित आहेत. त्यामुळे आमच्या भावना धुळीत मिळविणाऱ्यांचा तळतळाट होईल, असे सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 3:07 am