परभणी बाजार समितीत व्यापाऱ्यांच्या आíथक टंचाईमुळे उद्यापासून (शुक्रवार) कापूस खरेदी बंद करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. २७) कापूस खरेदी पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीने दिली.
सततचे ढगाळ वातावरण, मधेच पडणारा पाऊस यामुळे यंदा मे महिन्याच्या अखेपर्यंतही कापसाची वेचणी सुरू आहे. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्येच आटोपणारा कापूस हंगाम यंदा मात्र मे महिना संपत आला तरी सुरू आहे. गारपिटीने झाडा झालेल्या कापसाला पुन्हा पालवी फुटली आणि हाच कापूस आता वेचणीला आला आहे. त्यामुळे बाजारात कापसाची आवक पहिल्यासारखीच आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढतील, या अपेक्षेने कापूस घराबाहेर काढला नव्हता. परंतु एप्रिलपासून कापसाचे दर ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांवरच स्थिरावल्याने शेतकरी आता आपला कापूस बाजारात आणत आहेत.
सध्या बाजारपेठेत चांगल्या कापसाला ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपये, तर फरदड कापसाला ३ हजार ९०० ते ४ हजार १२५ रुपये दर मिळत आहे. परभणीच्या बाजारपेठेत कापसाची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. कापसाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या बाजार समितीत सध्या व्यापाऱ्यांकडे आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. खरेदी केलेल्या कापसाच्या गाठींची परराज्यात होणारी विक्री काही कारणामुळे थांबली असल्याने शेतकऱ्यांना देण्यासाठी व्यापाऱ्यांकडे पैसेच उपलब्ध नसल्याने तूर्तास कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय व्यापारी व बाजार समितीने घेतला. उद्यापासून २६ पर्यंत कापूस खरेदी बंद राहणार आहे. या चार दिवसांमध्ये व्यापाऱ्यांकडील कापसाच्या गाठी विक्री होतील आणि व्यापाऱ्यांची आíथक टंचाई दूर होईल, अशी शक्यता बाजार समितीने वर्तविली. त्यामुळे पुन्हा मंगळवारपासून कापूस खरेदीला प्रारंभ होईल, असे समितीने जाहीर केले. शेतकऱ्यांनी हे ४ दिवस कापूस आणू नये, असे आवाहन समितीने केले आहे.