परभणी बाजार समितीत येत्या ९ जूनपासून कापूस खरेदी बंद होणार आहे. हंगामातील शेवटची खरेदी या दिवशी होईल. यंदा ६ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदाची खरेदी कमी झाली.  
बाजार समितीत दरवर्षी कापसाची खरेदी मोठय़ा प्रमाणात केली जाते. हंगामाच्या सुरुवातीला कापसाची आवक नेहमीप्रमाणेच यंदाही मंदावली होती. सततचा अवकाळी पाऊस, मध्यंतरी झालेली गारपीट यामुळे कापसाचा दर्जा खालावला. मार्चपूर्वी वेचणी झालेला कापूस शेतकऱ्यांना न विकता दर वाढतील या आशेने घरात ठेवला होता. कापसाची वेचणी नोव्हेंबरपासूनच सुरू झाल्याने फेबुवारीपर्यंत जवळपास यंदाच्या हंगामातील कापूस शेतकऱ्यांच्या घरात होता. बागायतदार शेतकऱ्यांनी कापसाला पाणी दिल्याने व सतत पडणाऱ्या पावसाने कापसाला पुन्हा बोंडे लागली आणि मे अखेपर्यंत कापूस निघू लागला.
ढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे झाडणी झालेला कापूसही हिरवागार होऊन उन्हाळ्यातही त्याला फुले लागली. त्यामुळे बाजारात एप्रिल व मे महिन्यांत कापसाची आवक वाढली. यंदा कापसाचे दर पाच हजारांच्या आसपास राहिले. केवळ एक आठवडा कापसाचे दर ५ हजार ३०० वर गेले होते. परंतु दरात घसरण होत पुन्हा ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांवर कापसाचे दर स्थिरावले. मेच्या शेवटच्या आठवडय़ातही कापसाचे दर ४ हजार ९०० च्या पुढे गेले नाहीत.
गतवर्षीप्रमाणे मे महिन्यात कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता. परंतु भाववाढीच्या आशा मावळल्याने अखेर मे महिन्यात कापूस बाजारात येऊ लागला. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कापसाची खरेदी कमी झाली. गतवर्षी ६ लाख ३७ हजार क्विंटल कापसाची खरेदी परभणी बाजार समितीत झाली होती. यंदा ६ लाख क्विंटलच्या आसपास खरेदी झाली.