• खासगी कंपन्यांची मक्तेदारी मोडणार
  • तीन कृषी विद्यापीठे व महाबीजचा प्रकल्प

राज्यातील तीन कृषी विद्यापीठे व महाबीजच्या संयुक्त प्रकल्पातून येत्या दोन वर्षांत कपाशीच्या जनुक बदल बियाण्यांचे वाण (बीटी कॉटन) शेतकऱ्यांना शेतात लावण्यासाठी उपलब्ध होणार आहे. खासगी कंपन्यांची मक्तेदारी मोडून सरकार या क्षेत्रात प्रथमच पदार्पण करत आहे.

मोन्सॅटो कंपनीने जगात कपाशीच्या पिकात सर्वप्रथम जनुक बदल बियाण्यांची व्यापारी तत्त्वावर निर्मिती केली. देशात सन १९९८ मध्ये या बियाण्यांची लागवड सुरू झाली. सुरुवातीला क्रायवन एसी (बीजी वन) व नंतर २००६ मध्ये क्रायटू एबी (बीजी टू) हे दोन जनुक असलेले कपाशीचे वाण आले.

मोन्सॅटोने खासगी कंपन्यांमार्फत बीटी कपाशीच्या लागवडीसाठी बियाण्यांची विक्री सुरू केली. बोंडअळीला प्रतिकारक्षम असलेले हे वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले असून, आज देशात ९५ टक्के  क्षेत्रात जनुक बदल कपाशीची लागवड केली जाते. या बियाण्यांच्या क्षेत्रात १८ वर्षे या क्षेत्रात खासगी कंपन्यांची मक्तेदारी टिकून आहे. यापूर्वी सरकार त्यात उतरले नव्हते.

खासगी कंपन्या बीटी कपाशीच्या बियाण्यांची किंमत त्यांच्या मर्जीप्रमाणे ठरवत असत. त्यावर दोन वर्षांपासून सरकारने किमतीवर नियंत्रण आणून आठशे रुपये प्रतिपिशवी (४५० ग्रॅम वजन) अशी किंमत ठरवली. या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी मोन्सॅटो कंपनीकडून त्यांनी महाबीजने बीटी कपाशीचे तंत्रज्ञान विकत घेतले. त्यांनी राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व अकोले येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्याबरोबर सामंजस्य करार केला.

त्यामुळे विद्यापीठाने विकसित केलेल्या कपाशीच्या संकरित वाणांच्या बीटी कपाशीत परावर्तित करण्यास २०१३-१४ सालापासून प्रारंभ झाला.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बागायती क्षेत्रासाठी फुले श्वेतांबरी हा संकरित वाण विकसित केला आहे. एकरी १५ क्विंटल उत्पादन त्यामधून मिळते. मध्यम लांबीचा धागा, रस शोषणाऱ्या किडींना सहनशील, भुरी, जिवाणू व बुरशीजन्य करपा या रोगास प्रतिकारक्षम आहे. फुले श्वेतांबरी कपाशीचे बीटी कपाशीत रूपांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. पुढील वर्षी जनुक अभियांत्रिकी मान्यता समितीकडे तपासणी व मान्यतेसाठी ते पाठवण्यात येईल. महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात लागवडीसाठी ते उपलब्ध होईल. वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. अधीर आहेर यांनी त्यास दुजोरा दिला.

परभणी व अकोला विद्यापीठाचे जिरायत संकरित वाण तसेच महाबीजचे तीन संकरित वाण पुढील वर्षी प्रसारित होणार असून, त्याचेही रूपांतरण जनुक बदल कपाशीत करण्याचे काम सुरू आहे. सरकारी क्षेत्रातील बीटी कपाशीच्या प्रवेशामुळे आता शेतकऱ्यांना रास्त दरात बियाणे उपलब्ध होईल, त्यामुळे खासगी क्षेत्राच्या मक्तेदारीला आळा बसू शकतो.