शेअर बाजारात घसरलेल्या किमती, घटलेले कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित न मिळालेले भाव आणि त्यामुळे असलेली तंगी आणि आलेली मंदी या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे सध्या सर्व प्रकारच्या बाजारपेठांमध्ये कमालीचा शुकशुकाट दिसत असून कधी नव्हे एवढी ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याचा अनुभव व्यापारी घेत आहेत.
शेतकऱ्यांच्या खिशात पसा नसल्याने बाजारपेठा इतक्या ओस पडल्या आहेत की, दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे वेतन, जागेचे भाडे, वीजपाणी बिल भरणेही कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष अरुण भिसे यांनी गुरुवारी लोकसत्ताला सांगितले. हॉटेल व्यावसायिक अशोक कोठारी म्हणाले की, कधी नव्हे एवढा शुकशुकाट हॉटेल व्यवसायातही पहायला मिळत आहे. कापड बाजारपेठ असो की, धान्य बाजारपेठ असो किंवा किराणा व्यवसाय असो, तो शेतकऱ्यांच्या भरवशावर वृध्दिंगत होतो. शेतकऱ्यांच्या खिशात जेव्हा पसा खेळतो तेव्हाच बाजारपेठेत चतन्य असते. आज शेतकरीच कर्जबाजारी झाला आहे. त्याला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, असा हमी भाव दिला जाईल, अशी हमी सार्वत्रिक निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथील चाय पे चर्चा कार्यक्रमात दिली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर तो न मिळाल्यामुळे ‘हेच का अच्छे दिन?’, असा सवाल मोदी यांना विचारला जात आहे. आजही शेतकरी सावकारांच्या पाशात अडकला आहे. कर्जासाठी वित्त संस्थांकडे जाण्याऐवजी शेतकरी सावकाराकडे किंवा जमीनदारांकडे जात असल्याचे मुंबईत झालेल्या इंडियन सायन्स कांॅग्रेसमधील एका परिसंवादातून समोर आले आहे.
महाराष्ट्रात, विशेषत विदर्भ, मराठवाडय़ात दुष्काळ असल्याने सर्वत्र बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र असून दररोज होणारी कोटय़वधीची उलाढाल थांबली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीपूरक व्यवसाय दिसत नाहीत, अशी कबुली महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी एका जाहीर कार्यक्रमातून दिली आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनीही आर्णी तालुक्यातील लोणी येथील कार्यक्रमात हीच भावना व्यक्त केली आहे. राज्यात यंदा गाळप सुरू असलेल्या १७० साखर कारखान्यांनी साडेतीन कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असले तरी विदर्भाचा वाटा फक्त एक टक्का असल्याचे वास्तव समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात वसंत सहकारी साखर कारखाना (पोफाळी) या एकमेव कारखान्यात गाळप सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किमती मोठय़ा प्रमाणात खाली आल्या आहेत. शेअर बाजारातही घसरण कायम आहे. या व्यवसायात असलेल्या एका प्रतिनिधीने सांगितले की, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स ७९ अंकांनी घसरला आहे, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी २५ अंकांनी घसरला आहे. गेल्या साडेतीन वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण असल्याचा दाव्या केला जात आहे. सोन्या-चांदीचे भाव सराफा बाजारात वाढले असले तरी खरेदी-विक्री करणाऱ्यांची संख्या कमालीची रोढावली असल्याने तेथेही उदासीनता आहे.
या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम बाजारपेठेत कधी नव्हे एवढा शुकशुकाट होण्यात झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू असला आणि त्यांना मूळ वेतनाच्या शंभर टक्के इतका महागाई भत्ता असला तरी त्यांच्या भरवशावर बाजारपेठेतील चहलपहल फक्त आठ-दहा तारखेपर्यंत दिसून येते. खरी उलाढाल शेतकऱ्यांच्या खिशात पसे असतील तरच होते, पण शेतकरी हतबल आणि सरकार उदास असल्याने बाजारपेठा ओस पडल्या आहेत, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहेत.