मुंबई : जागतिक वन दिनानिमित्त एका संस्थेतर्फे रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, सुधागड येथील गिधाडांची गणना करण्यात येणार आहे. या गणनेत वन विभागाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत.

तीन दशकांहून अधिक काळ गिधाड संवर्धनाचे काम करणारे रायगड जिल्ह्यातील पक्षिशास्त्रज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांच्या ‘सिस्केप’ संस्थेमार्फत २१ मार्च रोजी जागतिक वन दिनानिमित्त रायगड जिल्ह्यात गिधाडांची गणना करण्यात येणार आहे. गिधाडगणनेसाठी श्रीवर्धन येथे ६ ते १० मार्च या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ४३ पक्षिप्रेमी व वन खात्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.

‘सिस्केप’च्या सर्वेक्षणानुसार म्हसळा आणि महाड तालुक्यात पांढऱ्या पाठीच्या व लांब चोचीच्या गिधाड प्रजातीची संख्या वाढलेली आहे. मध्यंतरी झालेल्या चक्रीवादळामुळे गिधाडांची घरटी उद्ध्वस्त झाल्याने त्यांना तात्पुरते स्थलांतर करावे लागले. गणनेच्या निमित्ताने चक्रीवादळामुळे गिधाडांच्या अधिवासावर झालेल्या परिणामांबाबत संशोधन करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी पाच प्रशिक्षणार्थी व दोन वन खात्याचे कर्मचारी असागट गिधाडगणना करणार आहे.

महाड, मुंबई, श्रीवर्धन येथील पक्षिप्रेमींसोबत वनरक्षक, वनशिपाई आणि वनक्षेत्रपाल प्रशिक्षणात सहभागी होते. या वेळी ४.३ चौ. किमी अंतरातील विविध वाड्या, नारळ बागा, रस्त्यांवरील झाडे यांचा अभ्यास करण्यात आला. पूर्वप्रशिक्षणात अंदाजे ३६ घरटी, ६० ते ७० अधिवासाची झाडे तर अंदाजे ७० गिधाडांची नोंद करण्यात आली.

कशी होणार गणना?

निरीक्षणस्थळी २० मार्च रोजी नियोजित सदस्य वास्तव्य करतील. पहाटेपासून घरट्यांच्या ठिकाणी गिधाडांची गणना होईल. दिवसभरातील हालचाली, जाण्या-येण्याची दिशा आदीची नोंद घेतली घेईल. या गिधाडगणनेमध्ये घरट्यांची एकूण संख्या, घरट्यांमधील गिधाडांची संख्या, ते झाड कोणाच्या मालकीचे आहे, त्यावरील गिधाडांची प्रजाती, घरटे बनविण्यासाठी वापरलेले साहित्य, घरट्यांतील पिल्लांची ओळख व इतर निरीक्षणे, दुर्बिणीद्वारे निरीक्षण अशा पद्धतीने गणना होणार आहे.