पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात देश आणि राज्याची वाटचाल ‘आर्थिक दिवाळखोरी’कडे सुरू आहे तर चंद्रपूरचा प्रवास प्रदूषणामुळे मृत्यूच्या दिशेने सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळेच प्रदूषणाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे, असा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे केला.

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद काकडे, सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांची उपस्थिती होती. राज्यातील जनता महागाईत भरडली जात आहे. केरोसीन आणि गॅसचे अनुदान बंद करण्याचा घाट शासनाने रचला आहे. नोटबंदीचा निर्णय पूर्णत: फसला आहे. दहशतवाद कमी झालेला नसून मोदी सरकारच्या काळात तो वाढला असा केंद्रीय गृह खात्याचाच अहवाल आहे. केंद्र व राज्यातही विकास बघायला मिळत नाही. कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची अक्षरश: थट्टा करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न शासनकर्त्यांनी चालविला आहे. यासह इतर सर्व स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे असाही आरोप पवार यांनी केला. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तिनतेरा वाजले असून महिलाही असुरक्षित आहेत. राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून केवळ गाजर दाखविण्याचे काम शासनकर्ते करीत आहेत. पण राज्यात विकासाचा बोजवारा उडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हय़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजीतून बाहेर पडावे, नव्या जोमाने काम करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन अजित पवार व सुनील तटकरे यांनी केले.